मुख्यमंत्र्यांची टीका

या आधीच्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली. त्यांचा फायदा मात्र बँका, घोटाळेबाजांनी उठवला आहे. यामुळे शेतकरी कर्जमुक्त करण्याची इच्छा राज्य सरकारची आहे. पण त्यासाठी आधी शेतकऱ्यांना आíथकदृष्टय़ा सक्षम करण्यात येईल आणि त्यानंतर कर्जमुक्ती केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरोळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शासनाच्या कृषी कर्जमाफीचा पट मांडला. खा. राजू शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या कृषी कर्जमाफीच्या इराद्याचे शेतकऱ्यांनी टाळय़ाच्या गजरात स्वागत केले.

शिरोळ येथे पंचायत समिती नूतन इमारत आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी झाले. पद्माराजे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश हाळवणकर,आमदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उण्यापुऱ्या दहा मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी धावता स्पर्श केला. ते म्हणाले, शेतकऱ्याला सक्षम करायचे असेल तर शेतीत गुंतवणूक करावी लागेल. पहिल्यांदा या सरकारने गुंतवणुकीसाठी प्रयत्न असून त्यासाठी २५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकाने जलयुक्तशिवार, शेततळी, विहिरी, सिंचन योजना यात ही गुंतवणूक करण्यात आली. यातून शेतकरी सक्षम होणार आहे, त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होईल. शेतकरी कर्जमुक्त झाला तर तो गुंतवणूक करेल. शेतजमिनीवरील आरक्षणाचे शिक्के हटले पाहिजेत यासाठी संघर्ष सुरू होता. तुमचे-आमचे सरकार आले. आमच्या सरकारने हे शिक्के हटवले. आरक्षण टाकून शेती घेण्याचा जो इतिहास आहे तो काळा इतिहास बदलण्याचा आणि शेतकऱ्यांना जमीन परत करण्याचा नवा इतिहास या राज्यात निर्माण केल्याचा दावा फडणवीस यांनी केला.  प्रास्ताविकात खा. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, भाजीपाला निर्यातीसाठी पायाभूत सुविधा म्हणून मध्यवर्ती शीतगृह स्थापन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. देशभरात भाजीपाला पोहोचण्यासाठी रेल्वेला स्वतंत्रपणे बोगी जोडावी अशी मागणी केली.