19 October 2019

News Flash

‘पाटबंधारे’कार्यकारी अभियंत्यास शिरोळमध्ये शेतकऱ्यांचा घेराव

शेतकरी आक्रमक बनल्याने अधिकाऱ्यांकडून उपसाबंदी शिथिल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना उपसाबंदी लागू

कोल्हापूर : उन्हाळ्याचे अद्याप दोन महिने राहिले असताना या कालावधीत पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून पाटबंधारे विभागाने पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी उपसाबंदी लागू केली आहे. शनिवारपासून (१२ मे) सुरू होणाऱ्या उपसाबंदीस शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला असून, उपसाबंदी रद्द करावी या मागणीसाठी सोमवारी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना घेराव घातला. शेतकरी आक्रमक बनल्याने अधिकाऱ्यांकडून उपसाबंदी शिथिल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील खालावलेला पाणीसाठा आणि वळीव पावसाने ओढ दिल्याने पाटबंधारे विभागाने पंचगंगा नदीतील पाणी वापरावर निर्बंध घातले आहेत. नदीकाठच्या गावांसाठी शनिवारपासून उपसाबंदी जाहीर केली आहे. इचलकरंजी ते तेरवाड बंधारा यादरम्यानच्या गावातील शेतकऱ्यांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे.

आप्पा पाटील यांच्यासह शिरदवाड, शिवनाकवाडी, लाट, लाटवाडी, हेरवाड आदी गावातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांना निवेदन दिले. या वेळी उपसाबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आप्पा पाटील म्हणाले, ‘पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांसाठी नाही, तर उद्योजकांसाठी पाण्याचे नियोजन केले आहे. दूषित पाण्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. तातडीने उपसाबंदीचा निर्णय रद्द करावा.’

उपसाबंदी रद्द करण्यास बांदिवडेकर यांनी असमर्थता दर्शवल्याने शेतकरी संतापले. त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारून जोपर्यंत उपसाबंदी रद्द होत नाही तोपर्यंत कार्यालयातच बसण्याचा निर्णय घेतला. अडीच तास शेतकरी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसले होते. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तेरवाड बंधाऱ्यातून पाणी पुढे गेल्यानंतर उपसाबंदी शिथिल केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले. या वेळी बंडोपंत कुलकर्णी, सातेंद्र खुरपे, लक्ष्मण चौगुले, बंडू कोडोले, प्रकाश तटमुटे आदी उपस्थित होते.

First Published on May 7, 2019 2:34 am

Web Title: farmers protest around at irrigation department executive engineer