स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुटुंबियांसोबत शेतामध्ये एकत्र येत शेतकरी सन्मान दिन साजरा केला. यावेळी ‘शेतकरी असल्याचा गर्व आहे’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. अनेक गावांमध्ये, शेतामध्ये असा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आज राबवण्यात आला.

शेतकरी सन्मान दिनानिमित्त शनिवारी सकाळी ‘आपल्या अन्नदात्यांना सलाम करू, घराच्या अंगणातूनच शेती अवजारांसोबत त्यांना मानवंदना देऊ’, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले होते.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये शेतकऱ्याने ‘करोना योध्दा’च्या रूपात कैकपटीने नुकसान सोसून देखील देशातील नागरिकांना अन्न पुरवले तसेच पुढील काळासाठी देशातील अन्नधान्याची कोठारं भरली. त्यामुळे समन्वय समितीच्यावतीने फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत १६ मे रोजी आपल्या अंगणात, घरावर अथवा घराजवळील योग्य ठिकाणी देशाचा राष्ट्रध्वज, संघटनेचा झेंडा अथवा कोणतेही कृषी अवजार १० मिनिटं लावून शेतकऱ्यांचा सन्मान करूया, असे आवाहन केले होते. त्याला पाठिंबा देत गावात, शेतात अनेक शेतकऱ्यांनी सहकुटुंब या उपक्रमात सहभाग नोंदवला.

‘गर्वाने म्हणा, मी शेतकरी आहे’ च्या दिल्या घोषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील आपल्या शेतात सहकुटुंब भाग घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, शेतकरी यांनीही असा उपक्रम राबवून शेतकरी सन्मानदिनाला प्रतिसाद दिला. यावेळी शेतकऱ्यांनी ‘जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या.