शेतकऱ्यांच्या हितासाठी एकाला पाडले आणि दुसऱ्याला आणले पण त्यांच्या हातूनही काही होत नसल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी ‘आपला हात जगन्नाथ’ असे समजून शेती उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

येथे आयोजित केलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  प्रदर्शनाचा समारोप खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित होणार असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. त्यावर कडी करत शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. सदाभाऊ खोत यांच्याकडे असलेल्या कृषी खात्याचा शेट्टी यांनी पंचनामा केला. पिकावर फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी याची साधी माहिती शेतकऱ्यांना देऊ न शकणाऱ्या शासनाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत शेट्टी यांनी कृषी खात्याला फैलावर घेतले. कापसाच्या बोन्ड अळीवर कोणती उपाययोजना केली पाहिजे याची माहिती कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकला नसल्याने शेतकऱ्यांचे ४० ते ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी संशोधन आणि तेथे चालणारे काम शेतक ऱ्यांच्या कामाचे नाही. एकीकडे शेतकऱ्याने ‘ग्लोबल’ होण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे त्याला किमान सुविधाही पोहोचवायची नाही. अशाने शेतकरी जागतिक स्पध्रेत कसा टिकणार, असा सवाल त्यांनी केला.

जेटलींकडे प्रश्न मांडणार

‘जीएसटी’पासून ते कृषी मालाच्या हमीभावापर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याची मांडणी अंदाजपत्रक पूर्वबठकीवेळी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडे करणार आहे. हे मुद्दे अधिवेशनातही उपस्थित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टाळीची वेळ दूर

खासदार अशोक चव्हाण यांची भेट, सतेज पाटील यांच्या कृषी प्रदर्शनास उपस्थिती यामुळे काँग्रेसची सलगी वाढत असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांवर शेट्टी यांनी अद्याप निवडणुकांना वेळ असल्याचे सांगत इतक्यात ‘टाळी’ देणार नसल्याचे स्पष्ट केले.