महाराष्ट्रात १०० हून अधिक शाखा असणाऱ्या फेडरल बँक  या खासगी क्षेत्रातील बँकेने कोल्हापूरमधील पूरबाधित दोन गावांना मदत जाहीर केली आहे.   बस्तवाड आणि राजापूरवाडी या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बँकेने ३.६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या गावातील कुटुंबे, संस्था अणि शाळांसाठी फायदेशीर ठरतील अशा उपक्रमांचा या योजनेत समावेश केला गेला आहे.  ज्या कुटुंबांच्या घरांचे या पुरात नुकसान झाले आहे, अशा लोकांसाठी बँकेतर्फे एकूण १०० घरे बांधण्यात येणार आहेत.  शाळांच्या पुनर्बाधणीसाठी बँक निधी उपलब्ध करून देणार आहे.  या शाळा बेंचेस, टेबल्स, संगणक, प्रोजेक्टर्स इ. नी सुसज्ज केल्या जाणार आहेत. रोजगार गमावलेल्यांना दुभती जनावरे आणि कुटीर उद्योगांसाठी यंत्रे देण्याचे प्रायोजकत्व बँकेने स्वीकारले आहे. आरओ वॉटर प्युरीफायर, घंटागाडी, सौर ऊर्जापत्रे, धूरी (फॉगिंग) आणि प्रथमोपचार वस्तू इ. सार्वजनिक सुविधांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. बँक ५०० झाडे लावून त्यांची देखभाल करणार आहे.   फेब्रुवारी २०२०  च्या अखेरीस ही योजना पूर्ण करण्याचा बँकेचा प्रस्ताव आहे.