केंद्र सरकारने लागू केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून, २० मे रोजी केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे केली. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १९ मे पासून लाखो शेतकरी दरवाढ मागे घ्या, अशा आशयाचे पत्रही लिहतील. स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी दूरभाष संवादद्वारा झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते.

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. नव्या दरामुळे शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून टाळेबंदी मुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून पुन्हा टाळेबंदी लागू केली असून शेतीमालाची वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. बाजार समिती बंद ठेवल्या आहेत. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसलेला आहे. अशा परिस्थिती रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमोडणार आहे. करोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकर्‍यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. ५० ते ६० टक्के दरवाढ केली. याच्या निषधार्थ स्वाभिमानी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं; पवारांचं केंद्राला पत्र

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या मुद्द्याकडे केंद्राचं लक्ष वेधलं आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पवारांनी पत्र लिहिलं आहे. “करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे,” असं पवारांनी म्हटलं आहे.