दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील एक लक्षणीय वैशिष्टय़ म्हणजे हा सामना आजी आणि माजी लोकप्रतिनिधी यांच्यात प्रामुख्याने होत आहे. उभय आघाडीतील नेत्यांची नावे पाहता ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. सत्तारूढ आघाडीमध्ये बहुतेक नेते माजी लोकप्रतिनिधी आहेत. विरोधी गोटात विद्यमान लोकप्रतिनिधींची यादी मोठी आहे.

गोकुळसारख्या मलईदार संस्थेचे नेतृत्व करण्याची इच्छा जिल्ह्यात सर्वाच्याच मनात भरलेली आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्तास्थान टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधकांनी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न करीत आपला झेंडा फडकवण्याचा इरादा राखला आहे. अशा वेळी राजकीय ताकद कामाला येते.

गेल्या वेळी सत्ताधारी गटाकडे महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके या अनुभवी नेत्यांच्या जोडीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक असे प्रभावी नेते होते. परिणामी त्यांना सत्ता राखणे सोपे गेले. तुलनेने विरोधी गटाचे सतेज पाटील, संजय मंडलिक हे लोकप्रतिनिधी नव्हते. या वेळी याबाबतीत मोठाच बदल घडला आहे. सत्ताधारी आघाडी ही माजींची आणि विरोधकांची आघाडी विद्यमानांची असा ३६० अंशांचा बदल घडवणारी बनली आहे.

विरोधकांमध्ये लोकप्रतिनिधींचा भरणा

विरोधी आघाडीमध्ये ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे ३ मंत्री, संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन खासदार, विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत आसगावकर अशी आमदारांची मोठी फळी आहे. त्यामुळे विरोधकांत लोकप्रतिनिधींची लांबलचक यादी आहे.

सत्ताधारी सत्तेच्या प्रयत्नात

सत्ताधारी आघाडीकडे नजर टाकली असता आमदार पी. एन. पाटील वगळता अन्य कोणी लोकप्रतिनिधी नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मोठे नाव असले तरी ते प्रचारात नाहीत. गोकुळमध्ये दबदबा असलेला महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक असा अवघा परिवार माजी लोकप्रतिनिधी आहे. भरमू पाटील, सत्यजित पाटील, बजरंग पाटील हे माजी आमदार आहेत. प्रभावी लोकप्रतिनिधी असताना विरोधक सत्ता प्राप्त करणार की राजकीय प्रभाव कमी असतानाही सत्ता टिकवण्यात सत्ताधारी बाजी मारणार याचे कुतूहल आहे.