अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना गती आली आहे. गेल्या पाच वर्षांत महामंडळाचा कारभार अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरला असला, तरी या मंडळावर वर्णी लागावी यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी व्यूहरचना सुरू केली आहे. सद्य:स्थिती पाहता विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर, माजी अध्यक्ष विजय कोंडके, माजी अध्यक्ष प्रताप सुर्वे, महेश मांजरेकर-अमेय खोपकर तसेच चित्रपट महामंडळ कृती समितीचे मेघराज राजभोसले-भास्कर जाधव अशा पाच आघाडय़ांमध्ये निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. बहुरंगी निवडणुकीचे संकेत स्पष्ट असल्याने ती चांगलीच गाजणार असे आता दिसू लागले आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक समितीच्या पाच सदस्यांनी घोषित केला. ही घोषणा कधी होते याकडे चित्रपटसृष्टीतील अनेकांचे लक्ष अगोदरच लागले होते. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम हाती आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी इच्छुकांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने हालचाली आरंभल्या आहेत. काही मातबर सभासद आणि निवडणूक हाताळण्याची हातोटी माहिती असणाऱ्यांचा भाव वधारत चालला आहे. अशांना आपल्या आघाडीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या कार्यकाळातील आíथक हिशोब वादग्रस्त ठरला होता. त्याचा त्यांनी योग्य खुलासा केला असला, तरी विरोधक अजूनही प्रश्न उपस्थित करीत आहेत. तथापि त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्याशी बऱ्याच जणांनी संपर्क केलेला आहे. त्यामुळे कोणाकडून निवडणूक लढवायची याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. महामंडळाच्या अध्यक्षपदामध्ये आपल्याला रस नाही. पण महामंडळाच्या हितासाठी निवडणूक लढविणार असल्याचे सुर्वे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
माजी अध्यक्ष विजय कोंडके यांनीही िरगणात उतरण्याची तयारी केलेली आहे. आपल्या आघाडीमध्ये उमेदवार कोण असतील हे आताच जाहीर करणार नाही. अन्य आघाडय़ांचे उमेदवार निश्चित होत आले की आमच्या आघाडीची नावे घोषित होतील. मी स्वत निर्माता या गटातून निवडणूक लढविणार आहे. नातेवाईक, ओळखीचा अशांना उमेदवारी न देता चित्रपटसृष्टीविषयी आस्था असणाऱ्यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगत महामंडळाच्या गत पाच वर्षांच्या राजकारणातून आपण बरेच काही शिकलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महामंडळाची निवडणूक महेश मांजरेकर-अमेय खोपकर यांची आघाडी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा करवीर नगरीत आहे. मात्र ते आघाडी करून निवडणूक लढविणार की अन्य कोणासोबत जाणार याबाबत स्पष्टीकरण झालेले नाहीं. खेरीज राजकीय लेबल लावून महामंडळाची निवडणूक लढविणे कितपत सयुक्तिक ठरणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनाही सभासदांचा पाठिंबा असल्याने ते ताकदीने निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
निवडणुकीला न्यायालयात आव्हान
चित्रपट महामंडळातील गर कारभाराविरोधात कृती समितीने गत दोनतीन वष्रे सातत्याने आंदोलने केली आहेत. वार्षकि सर्वसाधारण सभेत आíथक पत्रके सादर न करणे, भ्रष्टाचार यांविषयी कृती समितीच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे याचे निराकरण होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये, निवडणुकीला स्थगिती मिळावी या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे मेघराज राजेभोसले यांनी शनिवारी लोकसत्ताशी बोलताना दिली. भास्कर जाधव, सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे यांनीही या कृती समितीच्या सदस्यांची हीच भूमिका आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा करीत होतो. त्याची प्रत हाती पडली असून त्या आधारे उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.