गतवर्षी महापुराने अतोनात नुकसान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना घटनेच्या वर्षानंतर आर्थिक मदत मंजूर झाली आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना ४१ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त बाधितांना मदत वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या बाबींसाठी आणि वेगवेगळ्या लेखाशिर्षनिहाय सुमारे ३२१ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले होते. हे अनुदान नुकसानग्रस्त बाधितांना सर्व तालुकास्तरावर वाटप करण्यात आलेले आहे. परंतू, काही नुकसानग्रस्तांचे अनुदान वाटप प्रलंबित असून याबाबत शासनाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे.

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार नुकसानग्रस्त बाधितांना राज्य शासनाने ४१ कोटी ५८ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून टाळेबंदी कालावधीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये कमीत कमी कर्मचारी उपलब्धतेवर शासकीय कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उपाययोजनांतर्गत कोषागार कार्यालयामध्ये २० मार्च नंतर कोवीड-१९ उपाययोजनांशी संबंधित बिले स्वीकारली जातील असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर अन्य बाबींची बिले तालुक्याकडून कोषागार शाखेमध्ये स्वीकारली गेली नाहीत.

३१ मार्च रोजी सर्व वित्तीय नियमाप्रमाणे सर्व निधी शासनास समर्पित करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांकडून हा निधी शासनास समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदान वाटप करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभागाच्या सचिवांकडे लेखाशिर्षनिहाय सादर केला आहे.