प्रसंगावधान राखल्याने दुर्घटना टळली

कोल्हापूर : इचलकरंजीतील शासकीय करोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरला मंगळवारी दुपारी आग लागली. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून विद्युतपुरवठा खंडित केल्याने दुर्घटना टळली.

इचलकरंजी येथे इंदिरा गांधी सामान्य शासकीय रुग्णालय असून सध्या त्याचे करोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. येथील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एका करोना रुग्णाला लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यातून धूर येत असल्याचे पाहून असीम मोमीन या कर्मचाऱ्यांनी तातडीने विद्युतपुरवठा खंडित केला. त्याने अग्निशमन सिलेंडर फोडून मारा केल्याने आग आटोक्यात आली. संबंधित रुग्णाला परत दुसरे व्हेंटिलेटर लावून उपचार सुरू करण्यात आले.

या रुग्णालयातील विद्युत लेखापरीक्षणात अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. तेथील वायरिंग जुने झाले असून त्या इमारतीत लोंबकळत आहेत. दोष निदर्शनास आणून देऊनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे यांनी याबाबतची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना अवगत केली. प्रसंगावधान राखून आग वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. तसेच रुग्णांची माहिती घेत त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.