पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

संविधानाच्या जयघोषाने शनिवारी करवीरनगरी दुमदुमली. राजर्षी शाहू महाराज की जय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, हमारी आन बान शान – संविधान, संविधान, एक परिभाषा है – समता उसकी आशा है अशा घोषणा देत आज संविधान दिनानिमित्त निघालेली रॅली संपूर्ण करवीरनगरीत निघाली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकत्रे, विविध शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालयांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना अस्तित्वात आली. या दिनाचे स्मरण म्हणून सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातर्फे संविधान रॅली व संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौकातून राजर्ष शिंहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरीमाग्रे रॅली बिंदू चौकात आली. या वेळी बिंदूचौकात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, विभागीय जात पडताळीणी समिती कोल्हापूरचे सदस्य प्रशांत चव्हाण, विभागीय जात पडताळणीचे सदस्य सचिव विजयकुमार गायकवाड, शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये संविधान मोडीत निघाले असून त्याचा दुरुपयोगही झालेला आपण पाहतो. पण भारताचे संविधान आजही भक्कम आहे. विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा. आपले अधिकार जाणून घ्यावेत, सर्वानी संविधानाशी एकनिष्ठ राहावे, संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अबाधित राखणे हे सर्वाचे कर्तव्य आहे.

खासदार महाडिक म्हणाले, सत्तर वर्षांनंतरही या राज्यघटनेचा आदर आणि प्रतिष्ठा राखून देश चालत आहे आणि यापुढेही कित्येक वर्ष चालत राहील. या संविधानाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोोचावी यासाठी प्रशासनाने स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या धर्तीवर राज्यघटनेवर आधारित परीक्षा घ्याव्यात, त्यामुळे मुलांचा राज्यघटनेचा अभ्यास होईल व त्याद्वारे भविष्यातील एक जबाबदार नागरिक घडेल.

संविधान रॅलीची सुरुवात शाहूपुरी विद्यामंदिरची विद्यार्थिनी स्वनंदी महेश भगत हिने झेंडा दाखवून केली. या रॅलीमध्ये संविधानाची उद्देशिका, थोर विचारवंतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी यांचा समावेश होता.

संविधान रॅली बिंदू चौकात पोहोचल्यावर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या संविधान रॅलीत विविध शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालयांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.