दयानंद लिपारे, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा धोका दूर होऊ न आता मदतकार्याला गती आली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी शुक्रवारी सायंकाळी ३३ फूट होती. ती आता धोका पातळीपेक्षा ११ फुटांनी कमी झाली असून आत २५ बंधारे पाण्याखाली आहेत. आतापर्यंत ४ लाख व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. सूक्ष्म व लघु उद्योगांच्या  नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभर ठप्प झालेली कोल्हापूरची रेल्वे सेवा पुन्हा कार्यान्वित झाली असून परिवहन महामंडळाची बस सेवाही पूर्वपदावर आली आहे.

कोल्हापुरात पाणीबाणी कायम

गेला संपूर्ण आठवडा कोल्हापूर आणि जिल्हा महापुराच्या संकटाच्या छायेत होता. गेले तीन दिवस पावसाने ओढ दिली असून महापुराचे पाणीही चांगलेच ओसरले आहे. छावणीत राहिलेले बरेच लोक घरी परतत असून त्यांना चिखलमय भागातून स्वच्छता करून पुन्हा संसाराचा गाडा सुरू करण्याचे आव्हान आहे. याकामी प्रशासन सहकार्य करीत असले तरी त्यांच्यासमोर अनेक अडचणीही आहेत. कोल्हापूर महापालिका अजूनही पिण्याचे पाणीपुरवठा संपूर्ण शहरात सुरळीत करू शकली नसल्याने स्वच्छतेचे काम अडले आहे.पाणीपुरवठा विभागाच्या नाकर्तेपणाचा कटू अनुभव जनतेला येत आहे. शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा झाला हीच काहीशी समाधानाची बाब.

चार लाखांवर लोकांचे स्थलांतर

पूरग्रस्तांसाठी जिल्ह्य़ात १८१ संR मण शिबिर सुरू करून त्यामध्ये ५६ हजार ३९४ लोकांची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत ३६९ गावांमधून १ लाख २ हजार  कुटुंबांतील ४ लाख ७ हजार व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्ह्यतील ३१० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाकडून २ कोटी ८९ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उद्योजकांना दिलासा

पूरग्रस्त क्षेत्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी सांगितले. सर्वेक्षण करते वेळेस उद्योग बंद असल्यास जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात संपर्क साधावा.