महापुरामुळे राज्याचे प्रचंड  प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यासह पंजाब, केरळ, आसाम, कर्नाटक या राज्यांतही पूरस्थिती गंभीर असल्याने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित होण्याची शक्यता आहे, असे मत शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. परिस्थितीला घाबरू नका, शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला.

शिवसेनेच्यावतीने शिवसहाय्य योजनेत सुरू असलेल्या मदत कार्यात ते आज सहभागी झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहरातील बापट कॅम्प येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याच्या मदतीचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. पूरग्रस्त कुंभार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सर्वच बाबतीत सुजलाम् सुफलाम् असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यवर यावर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळली असून, या जिल्ह्यत अतोनात नुकसान झाले आहे. या भागात शिवसेनेसह इतर संघटनांकडून मदतीचा ओघ सुरु असून कोल्हापूर पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे,असे ठाकरे यावेळी म्हणाले.

पूरग्रस्त महिलेचे गाऱ्हाणे

राज्य शासनाने पूरग्रस्तांना,घराची पडझड झालेल्या घरमालकांना मदत देऊ  केली आहे. मात्र,भाडेकरूंना मदत नसल्याने काय करावे?असा प्रश्न पूरग्रस्त भाडेकरू महिलेने केला आणि त्याचे उत्तर नसल्याने आदित्य ठाकरे आणि आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे हे निरुत्तर झाले. यावर शिंदे यांनी लगोलग याबाबत तहसीलदारांना सूचना केल्या जातील, असे सांगितले.