08 August 2020

News Flash

पूरग्रस्त भागांत मदतीची वाटमारी

सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रोज राज्यभरातून शेकडो वाहने मदत साहित्य घेऊन येत आहेत.

मदतीची वाहने आली की अशी परस्पर अडवली जात आहेत.

टोळय़ांकडून दमदाटीने लुटालूट, जातीपातीच्या राजकारणाला ऊत

दयानंद लिपारे, कोल्हापूर

मदतीचे ट्रक अडवणे, परस्पर आपल्या गावा-वस्तीवर न्यायला भाग पाडणे, जाती-धर्माच्या गटातटात मदतीचे वाटप करायला भाग पाडणे, इथपासून ते थेट दंडेली करत मदतीची वाटमारी करणे; अशा घटना पूरग्रस्त भागांत सध्या मोठय़ा प्रमाणात घडू लागल्या आहेत. या अनुभवांमुळे संकटकाळी दूरवरून मदतीसाठी धावून आलेले देखील हादरून गेले असून अर्ध्या वाटेवरूनच माघारी परतू लागले आहेत.

कृष्णा-पंचगंगा नदीला आलेल्या प्रलयकारी महापुरामध्ये कोल्हापूर, सांगलीचे मोठे नुकसान झाले. पुराच्या या तडाख्याने या दोन्ही शहरांबरोबरच परिसरातील शेकडो गावे उद्ध्वस्त झाली. आपल्या बांधवांवर कोसळलेल्या या आपत्तीची वार्ता कळताच राज्य आणि राज्याबाहेरून मदतीचा ओघ वाहू लागला. त्यातून सुरुवातीला सर्वत्र माणुसकीचेच दर्शन घडत होते. मात्र आता जसजसे पुराचे दु:ख ओसरू लागले तसतसे माणसातील पशू जागा होत, लूटमार, फसवणुकीच्या घटना जागोजागी घडू लागल्या आहेत. या अनागोंदीमध्ये पुन्हा गावगाडय़ातील आपआपली जात, धर्म, पंथ, राजकीय गट-तट, दंडुकेशाही याचे तण माजले आहे.

सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रोज राज्यभरातून शेकडो वाहने मदत साहित्य घेऊन येत आहेत. अन्नधान्य, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, कपडे, औषधे, गृहोपयोगी वस्तू अशा वस्तूंचा सध्या इथे पूर येऊ लागला आहे. हे मदतसाहित्य घेऊन येणारी ही वाहने प्रचारकी फलक लावूनच येत असल्याने ती लगेच ओळखू येतात. सध्या या दोन्ही जिल्ह्य़ांत शिरणाऱ्या मुख्य रस्त्यांवर या वाहनांच्या प्रतीक्षेत अनेक टोळय़ा जणू जागोजागी दबा धरून बसल्या असतात. असे वाहन आले, की या टोळय़ा हे वाहन अडवतात. आतील व्यक्तींना लगेच ताब्यात घेत आपल्याला हव्या त्या ठिकाणी गाडी वळवायला भाग पाडतात. कधी मदतीची खूप गरज असल्याचे भासवून, विनंती करत; तर कधी पुढे लूटमार सुरू आहे, गोंधळ उडाला आहे अशी चुकीची माहिती देत, तर काहीवेळी थेट टोळीने अडवत ही मदत परस्पर लांबवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. काही ठिकाणी मदत वाटणाऱ्यांच्या जाती-धर्माची माहिती घेत ही मदत ‘संबंधित’ ठिकाणी वळवण्याचे प्रकारही सुरू आहेत.

मदत करणारे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असे दूरवरून आलेले असतात. त्यांना या भागाची नेमकी माहिती नसते. मदतीची नेमकी गरज कुणाला, ती कशी पोहोचवायची याविषयी देखील अज्ञान असते. या स्थितीचा गैरफायदा घेत मदतीची परस्पर पळवापळवी सुरू आहे. मग अशा हतबल स्थितीत मदत करणारे देखील सांगतील त्या गावात जातात, मदत दिल्याची छायाचित्रे काढतात आणि या पूरग्रस्त भागांतून माघारी फिरतात. ज्यांना संशय वाटतो ते या टोळय़ांना चुकवत फिरत राहतात. या साऱ्यातून काही निराश झालेले तर मदत न वाटताच पुन्हा परतीचा रस्ता पकडतात.

त्रास देणारा अनुभव

आम्ही खानदेशातून मदत घेऊन इथे आलो होतो. आम्हाला ही मदत दुर्गम भागांतील एखाद्या गरजू गावाला द्यायची होती. पण वाटेतच आम्हाला अडवत अन्यत्र मदत करण्याविषयी गळ घालण्यात आली. लगोलग काही मुले आमच्या वाहनातील मदत उतरवूनही घेऊ लागली. परक्या प्रदेशात हा अनुभव धक्का देणारा होता.

– संजय पाटील, जळगाव

नकोच ते मदतकार्य

मदतीचा ओघ पाहून माणसातील राक्षस जागा झाल्यासारखे वाटत आहे. वाहने अडवून सारी मदत लागणाऱ्या टोळ्या जागोजागी दिसत आहेत. या वाढत्या प्रकारांनी दात्यांवर हताश होण्याची वेळ आली आहे. हे सर्व प्रकार पाहून आम्ही इचलकरंजीतून उभ्या केलेल्या मदतीचे वाटप तूर्तास थांबवले आहे.

शीतलकुमार मगदूम अध्यक्ष, इचलकरंजी शिवसेना व्यापारी संघटना

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 1:22 am

Web Title: flood relief vehicle stopped before reaching affected people in kolhapur zws 70
Next Stories
1 पूरग्रस्त व्यावसायिकांना ७५ टक्के नुकसान भरपाई – सुभाष देशमुख
2 पूरग्रस्तांच्या मदतीत त्रुटी, शासन यंत्रणेवर ताण
3 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दुष्काळग्रस्तांचे हात!
Just Now!
X