‘कालिका कशा गं बाई भुलल्या, इवल्या फुलात बाई फुलल्या’ या काव्यपंक्तीचा प्रत्यय आज करवीरनगरीत येत होता. त्याला कारणही तितकेच खुलणारे आणि लोभसवाणे होते. पहिल्या-वहिल्या फुलांच्या महोत्सवाला रविवारी कोल्हापुरात प्रारंभ झाला. फुलांच्या सौंदर्याचा खजिनाच तब्बल सहा एकर जागेत रिता झाला होता.

कोल्हापूरकरांची आजची सकाळ उगवली ती मोहकतेने. महाराष्ट्रातील प्रथम भव्य-दिव्य अशा कोल्हापूर प्लॉवर फेस्टिव्हलला रविवारी सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी उपक्रम आखले जात असून त्याला पुढे नेणारा हा आगळा-वेगळा महोत्सव. पाहणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेचे पारणे फेडणारा. नानाविध प्रकारच्या फुलांचा गंध, रंग, रूप नादावणारे.

येथील पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस उद्यानातील सहा एकर जागेमध्ये आयोजित केलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीला चालना

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी गेल्या तीन वर्षांत अनेकविध उपक्रम हाती घेतले आहेत. हे सूत्र पुढे नेण्याचा निर्णय यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, कोल्हापुरात या पुढील काळात अधिक पर्यटक यावेत यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

येत्या ९  ते ११ फेब्रुवारी असा तीन दिवसांचा कला महोत्सव आयोजित करण्यात येणार असून यामध्ये जागतिक कीर्तीच्या कलावंतांना आमंत्रित करण्यात येत आहे. एप्रिल-मेमध्ये दोन  दिवसांच्या ५० निशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याचे नियोजन आहे. पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल महत्त्वाचे दालन ठरेल असा विश्वास व्यक्त करून  पाटील म्हणाले, पाच दिवसांसाठी आयोजित केलेल्या फ्लॉवर फेस्टिव्हला दहा लाख पर्यटक भेट देतील.

फूलशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन आणि नवे क्षेत्र उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा फ्लॉवर फेस्टिव्हल भव्य जागेत अनोखा, अद्भुत आणि लाखो फुलांचा उत्सव बनला आहे.

फुलांचे मनोहारी ताटवे

या फेस्टिव्हलमध्ये दीड लाखांहून अधिक फुलझाडे तर एक लाखाहून अधिक फुले आहेत. यातून फ्लोरिकल्चर, तसेच ग्रार्डन विकासासाला नवी दिशा मिळणार आहे. यामध्ये देशी-विदेशी पुष्प रचना, पुष्पशिल्पे, फॅशन शो, कला स्पर्धा, प्रदर्शन, चर्चासत्रे, तज्ज्ञांची व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लोकांसाठी उपलब्ध केली आहे.