15 December 2018

News Flash

कोल्हापूर, सांगलीमध्ये धुक्याची चादर

वीजपुरवठय़ात तांत्रिक बिघाड निर्माण होऊन आज बराच काळ वीजपुरवठा विस्कळीत झाला.

सोमवारी सकाळी पसरलेले सांगलीतील धुके.

उन्हाळय़ाची तप्त चाहूल लागली असताना अचानक हवामान बदल होऊन दाट धुके पसरल्याने त्याचा फटका सोमवारी कोल्हापूर, सांगली  जिल्ह्यत घरोघरी तसेच उद्योगास बसला. उद्योग क्षेत्रास मोठा आर्थिक फटका बसला. वीजपुरवठय़ात तांत्रिक बिघाड निर्माण होऊन आज बराच काळ वीजपुरवठा विस्कळीत झाला.

युद्धपातळीवर यंत्रणा राबवल्याने अध्र्याहून अधिक जिल्ह्यत विस्कळीत झालेला बहुतांश वीजपुरवठा चार तासांत सुरळीत करण्यात यश आले. सांगलीच्या दोन अतिउच्चदाब वाहिन्या वगळता जिल्ह्यतील वीजपुरवठा सुरळीत होता. प्रचंड धुक्यामुळे आज पहाटे पाच वाजण्याच्या  सुमारास मुडशिंगीसह तळंदगे ते बिद्री, तळंदगे ते तिळवणी, तळंदगे ते सावंतवाडी अशा एकूण चार २२० केव्ही क्षमतेची अतिउच्चदाब वाहिन्यांच्या अर्थिग तारा तुटल्याने संबंधित वीज उपकेंद्रांना येणारा वीजपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी, कोल्हापूर जिल्ह्यतील अनेक भागांत पहाटे पाच  ते साडेनऊ  या काळात खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. गोकुळ शिरगाव व फाइव्ह स्टार एमआयडीसी उपकेंद्राचा वीजपुरवठा सकाळी पूर्ववत करण्यात आला. परंतु काही कालावधीत उपकेंद्रातच बिघाड निर्माण झाल्याने दुपारी पुन्हा खंडित झाला. दुपारी दोन  वाजण्याच्या सुमारास तो सुरळीत झाला.

युद्धपातळीवर दुरुस्ती

मुडशिंगी उपकेंद्राला कराडहून आलेल्या वाहिनीवरून सुरळीत करून बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. महापारेषण अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून परिस्थिती हाताळली. मुख्य अभियंता  महावितरणचे किशोर परदेशी, प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, तर महापारेषणचे अधीक्षक अभियंता ए. बी. दडमल व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली.

दाट धुके.. बिघाडाचे कारण

दाट धुके पडल्याने हवेतील आद्र्रता वाढते. आद्र्रतेत पाण्याचा अंश असल्याने वाहिनीतील दोन तारांमधील हवेमुळे विलग राहणारा विद्युत दाब एक होतो. त्यामुळे विजेचे वहन, पारेषण पुढे होऊ  शकत नाही. पर्यायाने वीजपुरवठा ठप्प होतो. अशाच प्रकारचा बिघाडाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यला बसला.

डझनभर उपकेंद्रांना फटका

महापारेषणच्या मुडशिंगी, तिळवणी, बिद्री, गोकुळ शिरगाव, फाइव्ह स्टार, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोथळी, राधानगरी, कुरुंदवाड या अतिउच्चदाब वीज उपकेंद्रांना धुक्याचा फटका बसला. यामुळे सुमारे २९५ मेगावॉट विजेचे पारेषण चार तास ठप्प झाले.

सांगलीलाही फटका, प्रमाण कमी

सांगली जिल्ह्यत मिरज औद्योगिक वसाहत भागातील वीज उपकेंद्राचा पुरवठा खंडित झाला होता. मात्र तो  पर्यायी मार्गाने तातडीने सुरू करण्यात आला.

मिरज ते विटा व कर्वे ते कडेगाव अतिउच्चदाब वीजवाहिन्यांवर बिघाड झाला होता. पैकी कर्वे-कडेगाव वाहिनी कराडहून सुरू केली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत दोन्ही अतिउच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

First Published on March 6, 2018 3:09 am

Web Title: fog issue in kolhapur sangli