दयानंद लिपारे

शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कुलगुरू निवडीसाठी २५ जणांच्या मुलाखती होऊन त्यातून अंतिम पाचमधून एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहेत. याच वेळी शिक्षणक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुलगुरूपदावर निवड व्हावी यासाठी इच्छुकांनी राजकीय नेत्यांना आधार घेण्यास सुरुवात केली आहे. निवडीचे अंतिम अधिकार कुलपतींना असल्याने त्यांचा भाजप नेत्यांच्या गाठीभेटीवर जोर आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील बडय़ा नेत्यांकडेही काहींनी लकडा लावला आहे. यामुळे या निवडीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.

डॉ. देवानंद शिंदे यांनी त्यांची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपली. त्यानंतर नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार आला. त्यांनी केलेल्या प्रभाग विभागप्रमुख निवडीवरून विद्यापीठात वाद रंगला. प्रभारी कुलगुरूंना या निवडी करण्याचा अधिकार नाही, असा आक्षेप घेतल्याने त्याचे पडसाद अद्यापही विद्यापीठ वर्तुळात आहेत. नवीन कुलगुरू निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले. देशभरातील शिक्षणक्षेत्रात लौकिक असलेल्या १६९ उमेदवारांनी अर्ज केले होते. याच वेळी शासकीय पातळीवरून कुलगुरू शोध समिती स्थापन झाली. त्यांनी २५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरवले. अपात्र ठरलेल्या मध्ये काही नामवंत अभ्यासक संशोधक म्हणून ओळखले जातात. या प्रक्रियेतून बाहेर पडल्याने या निवडीबाबत त्यांनी संशय व्यक्त केला.

पडद्याआडून राजकीय हालचाली

शोध समितीने अर्जाची छाननी केलेल्या २५ जणांच्या मुलाखती गेल्या दोन दिवसांत दूरचित्र संवादाच्या माध्यमातून पार पडल्या. त्यातील पाच जणांची नावे शोध समिती निश्चित करून यादी कुलपती कार्यालयाकडे दिली जाणार आहे. त्यानंतर कुलपतींकडे या पाच जणांचे सादरीकरण होणार आहे. त्यांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्यानंतरच कुलपती कोणा एकाच्या नावाची मोहोर उमटवणार आहे. पहिल्या शोध समितीने केलेल्या यादीत आणि त्यानंतर अंतिम पाच जणांत स्थान मिळवण्याच्या दोन महत्त्वपूर्ण पायऱ्या पूर्ण केल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपली निवड केली जावी यासाठी त्यांनी संपर्क आणखीनच वाढलेला आहे.

आत्तापर्यंत केलेल्या सहकार्याचे स्मरण करत अंतिम टप्प्यासाठी आपल्या नावाचा आग्रह धरला जावा यासाठी इच्छुकांनी राजकीय जोर-बैठकावर जोर दिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे शब्द टाकला जात आहे. तर काही जण महाविकास आघाडीच्या माध्यमातून असाच प्रयत्न करीत आहेत. नैतिकतेच्या पातळीवर एका अर्थाने हा सारा वशिलेबाजीचा मामला आहे, अशी कुजबुज विद्यापीठ वर्तुळात होत आहे. तसेच मुलाखतीत अपात्र ठरलेले खासगीमध्ये हा मुद्दा गुणवत्ता, निकषांच्या आधारे सिद्ध करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर कुलगुरू निवडीसारख्या प्रकरणाला राजकीय वळण देणे कितपत रास्त आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात राजकीय रंग लावू नये अशी चर्चा सातत्याने केली जाते. तसा आग्रहही कायम राखला जातो. प्रत्यक्षात मात्र राजकीय हस्तक्षेप व राजकीय वजन वापरल्याशिवाय महत्त्वाच्या पदी वर्णी लागणे अशक्य आहे, असा समज इच्छुकांचा झाल्याचे दिसते. शिवाजी विद्यापीठातील सध्या कुलगुरू निवडीसाठी इच्छुकांच्या सुरू असलेल्या राजकीय लागेबांधे ज्या पद्धतीने वापरले जात आहे, त्यातून हा समज अधिक दृढ होण्यासारखे चित्र असल्याचे दिसत आहे. या साऱ्या मेहनतीतून विद्यापीठाला नेमके कोण कुलगुरू मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

जनसंपर्क संस्थेची मदत

कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या एकाने तर मुंबईतील जनसंपर्काचे काम करणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली. या माध्यमातून मुंबई, पुण्यातील पत्रकार व राजकीय नेत्यांना हाच उमेदवार कसा योग्य किंवा त्याने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती असलेला मेल पाठविला जात होता. या व्यक्तीची कुलगुरूपदी निवड झाल्यास शिवाजी विद्यापीठाचे भवितव्य कसे चांगले असेल, असे चित्रही रंगविण्यात आले होते.