उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला

कोल्हापूर : मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोला शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कोकण, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अन्य जिल्ह्यांत पुराचे संकट गंभीर असल्याने राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. त्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस यांना सुनावले.

पूरग्रस्त कोल्हापूरची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या प्रकारे पुनर्वसन करण्यावर सरकारचा भर आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, की भविष्यात पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी काही कठोर निर्णय  घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. नदीपात्रांमध्ये झालेल्या अतिक्रमणांबाबत आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी कोसळलेले संकट फार भयानक आहे. काही ठिकाणी दरडींच्या ढिगाऱ्यांखाली आपल्याच माता-भगिनींचा मृत्यू झाला. या संकटातून बाहेर पडताना जीव वाचवण्यास प्राधान्य दिले जाते. त्याबरोबरच करोना संसर्ग पसरू नये आणि पुरानंतरच्या संभाव्य रोगराईला प्रतिबंध करण्यासाठी पावले उचलणेही आवश्यक असते, मुख्यमंत्री म्हणाले.

पुराचे भीषण वास्तव मी बघितले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे पुनर्वसन, नुकसानभरपाई आणि पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाला गती दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.   – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री