हसन मुश्रीफ यांचे शेट्टी यांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांची वक्तव्ये गैरसमजुतीतून आहेत. ती जबाबदार नेत्याला शोभणारी नाहीत. दुसऱ्यांवर चिखलफेक करणे, आरोप करणे बरे नव्हे, असे प्रत्त्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिले.

महापूर मदतीवरून शेट्टी यांनी कालच्या मोर्चावेळी सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आज मुश्रीफ म्हणाले, महापुराने नुकसान झाले त्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले आहेत. प्राथमिक नुकसान भरपाईचा निर्णय झालेला आहे, अंतिम नुकसान भरपाईचा निर्णय अद्याप झालेला नाही. ७१ हजार, २८९ घरांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. प्रत्येकी दहा हजाराप्रमाणे रकमा खात्यावर वर्गही होत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किती नुकसान भरपाई द्यावयाची याबाबत निर्णय झालेला नाही. राजकारणामध्ये चढउतार येत असतात. परंतु दुसऱ्याला शिव्या-शाप देऊन परिस्थिती बदलत नसते. पायातील हातात घ्या, हे वाक्य फारच चुकीचे होते. संघटनेचे नेते म्हणून  तुमच्याबद्दल लोकांच्या भावना बिघडू नयेत याची काळजी घ्या, असा इशारेवजा सल्ला मुश्रीफ यांनी शेट्टी यांना दिला आहे.