चुंबकीय शक्तीच्या आधारे वीजनिर्मिती करण्याचे सूत्र कोल्हापूरच्या नचिकेत भुर्के यांनी गेली १५ वर्षांच्या संशोधनातून समोर आणले आहे. या संशोधनाच्या पेटंटसाठी मुंबई येथील इंडियन पेटंट कार्यालयात प्रस्ताव दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. हे संशोधन देशातील पहिलेच असल्याचा दावा त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
नचिकेत भुर्के म्हणाले, आपल्या या संशोधनामुळे फिजिक्सच्या फंडामेंटल लॉमध्ये परिवर्तन होणार आहे. जेथे जेथे फ्रिक्शन (घर्षण) होऊ शकते, तेथे हा शोध उपयोगी पडू शकतो. त्याची एअर फ्रिक्शन, वॉटर फ्रिक्शन, रोड फ्रिक्शन, व्हॅक्युम फ्रिक्शन, स्पेस फ्रिक्शन आदी प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. आपल्या शोधामध्ये मॅग्नेट (चुंबक) हा मूळ स्रोत ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात आला आहे. त्यासाठी कुठल्याही बाह्य ऊर्जेची गरज लागत नाही. या ऊर्जा निर्मितीमध्ये चुंबक व बाह्य चुंबकीय शक्ती यांचा ताळमेळ घातला गेला आहे.
या शोधातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला धरणे, सोलर एनर्जी प्लँट, अॅटोमिक सेंटर, पवन ऊर्जा, आदींसारखी मोठय़ा पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही तसेच या ऊर्जेमुळे प्रदूषित वातावरणाला आळा बसेल. या ऊर्जेवर सर्वप्रकारची वाहने चालू शकणार आहेत. ही ऊर्जा सोप्या पद्धतीने निर्माण होते व आताच्या तुलनेत अत्यंत माफक दरात ती मिळू शकते. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी वापरता येऊ शकते. या संशोधनासाठी लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘पीटीसी’च्या माध्यमातून पेटंटसाठी अर्ज दाखल करणार आहे.
केआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअिरगची पदवी नचिकेत भुर्के यांनी घेतली आहे. त्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून नॉन कन्व्हेशनल (अपारंपरिक), नॉन सेंट्रलाईज (विकेंद्रित) पॉवर जनरेशनचा (ऊर्जा निर्माण)शोध यावर संशोधन करून चुंबकापासून ऊर्जा निर्मिती करता येते, असे सूत्र तयार केले आहे, असे अॅड. हर्षद भोसले यांनी सांगितले.