कागल येथे संगनमताने बॉम्ब बनविण्याचा कट रचणाऱ्या व त्यासाठीचे साहित्य बाळगणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील चौघा आरोपींना गुरुवारी येथील सत्र न्यायाधीश पी. एम. खंबायते यांनी प्रत्येकी तीन वष्रे सहा महिन्यांची सक्तमजुरी व एक हजार रुपयाचा दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. अजिंक्य मनोहर भोपळे, अनिकेत शिवाजी माळी, अनिल पोपट खरसे (तिघे रा. चोकाक) व नीलेश बबनराव पाटील (रा. माले मुडिशगी) या आरोपींना भारतीय स्फोटक पदार्थाचा अधिनियम १९०८ आणि भारतीय दंड विधान कलम १२० अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या कामी सरकारी पक्षातर्फे अॅड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.
२३ मार्च २०१४ रोजी हातकणंगले येथील पोलीस निरीक्षकांना उपरोक्त चार आरोपी हे हातबॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य जमवत आहेत. त्याचा वापर लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला आवश्यक असेल तर त्यासाठी ते ग्राहक शोधत आहेत, अशी माहिती मिळाली. हे चौघेही एकमेकांचे मित्र आहेत. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी माणूस पाठवून सापळा रचला. ५ एप्रिल रोजी नियोजित सापळय़ानुसार पोलीस पथकाने कागल गावच्या हद्दीतील महालक्ष्मी पेट्रोल पंपापासून शंभर फूट अंतरावर असलेल्या लोकवस्तीत छापा टाकला. तेव्हा रात्री साडेदहा वाजता सुरुवातीस दोन व नंतर दोन आरोपी तेथे आले. पोलिसांनी त्यांच्याकडील चार जिवंत बॉम्ब व बॉम्बसाठी लागणारे साहित्य, रिमोट आदी वस्तू जप्त केल्या. चौघांना अटक करण्यात आली.
न्यायालयात सुनावणी दरम्यान १५ साक्षीदार तपासण्यात आले. कागल पोलीस ठाण्यातील पोलीस पथकातील साक्षीदार, आरोपींचा मित्र तानाजी साताप्पा शेटे, मध्यस्थ असिफ गुलाब शेख, बॉम्बनाशक पथकातील सूर्यकांत जाधव यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. यातील काही पंच व ज्यांच्याकडून साहित्य खरेदी केले असे दुकानदार फितूर झाले. अन्य साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.