पेट्रोल चार, तर डिझेल नऊ रुपयांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे शेजारच्या कर्नाटक, गोवा राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील इंधन महागले आहे. कर्नाटकात पेट्रोल चार रुपये तर डिझेल तब्बल नऊ रुपयांनी स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील महाराष्ट्रातील वाहनधारक वाट वाकडी करत कर्नाटकच्या दिशेने जात आहेत. यामुळे कर्नाटकच्या सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांना मोठा आíथक फटका बसल्याची तक्रार पेट्रोल पंप  चालकांनी केली आहे.  राज्यातून होणाऱ्या इंधनाच्या कर आकारणीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याबद्दल महाराष्ट्रप्रेमी वाहनधारक, वाहनधारक संघटना नाराजी व्यक्त करत आहेत.

वस्तू  व सेवा कर आकारणीचा निर्णय झाल्यानंतर त्याचे काही परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. त्यातील एक ठळक बाब म्हणजे राज्याच्या सीमेलगत असलेल्या राज्यात इंधनाचे दर कमी झाले आहेत. पूर्वी गोवा राज्यातील इंधनाचे दर कमी होते . आता त्यात कर्नाटकाची भर पडली आहे. महाराष्ट्राला लागून असलेले गोवा राज्याचे आकारमान, सीमाभाग आणि कर्नाटक राज्याचे आकारमान, सीमाभाग यामध्ये मोठे अंतर आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यच्या सीमा कर्नाटकाला खेटून आहेत. अगदी काही किलोमीटर अंतर पार केले की थेट कर्नाटकाच्या सीमेत जाऊन तेथील पंपावरून  स्वस्तातील इंधन भरून घेण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. परिणामी या जिल्ह्य़ातील बेंगलोर वा  दक्षिणेकडील राज्यात जाणारी सर्व प्रकारची वाहने राज्यात जुजबी इंधन भरून घेतात आणि कर्नाटक, गोवा राज्यातील पंपावर टाकी पूर्ण भरेपर्यंत इंधन भरून घेत आहेत.

राज्याचा इंधन विक्रीत घट 

अनेक शहरात पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे असल्याने  शहरातील व शहराबाहेरील पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावर लक्षणीय परिणाम झाला आहे.  राज्यात मालवाहतुकीतून चाळीस टक्के डिझेल विक्री होते. दरवाढीमुळे इंधन  विक्री कर्नाटक, गोवा आदी शेजारच्या राज्यात  स्थलांतरित होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान राज्यातील  पंपचालकांना होत आहे. याबाबत पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अंबपवाडी  येथील ओम साई हायवे सíव्हसचे रवींद्र लाड म्हणाले, की  बेंगलोरहून  येणारी वाहने कर्नाटक हद्दीत इंधन पूर्णपणे भरून घेतात आणि राज्यातून जाणारी वाहने जुजबी इंधन घेऊन उर्वरित इंधन कर्नाटकात स्वस्तात  मिळणाऱ्या पंपावर भरतात . यामुळे राज्यातील पंपावरील इंधन विक्रीत घट  झाल्याने पंपचालकांना आíथक फटका बसला आहे. तर राज्यातून इंधनाद्वारे मिळणाऱ्या अपेक्षित महसुलात घट होणार आहे . या दुहेरी फटक्यांचा  विचार करून राज्यशासनाने उचित निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली .

अन्य राज्यात स्वस्ताई

राज्यात एक ऑक्टोबरपासून पेट्रोल – डिझेलवरील एलबीटी रद्द करून डिझेलवर प्रति लिटर दोन रुपये दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात  आली आहे. यामुळे सर्वत्रच डिझेल आणि पेट्रोल महागले आहे. महाराष्ट्रात विविध स्थानिक करामुळे  लगतच्या  कर्नाटक, आंध्रप्रदेश , मध्य  प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षा  महाराष्ट्रात डिझेलचा दर सरासरी चार  रुपये  प्रति लिटर जादा दर आहे. पेट्रोलचा नऊ  रुपयांनी जादा दर आहे. साहजिकच राज्याच्या सीमेवरील  इंधन विक्रीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.

समान दराची मागणी

शासनाने वस्तू  व सेवा कर आकारणीचा निर्णय घेताना पेट्रोल , डिझेल यांना वगळले आहे, ही बाब मान्य  आहे . पण हे करताना एक देश – एक कर या धोरणाला धरून किमान देशभर इंधनाचे दर  सर्वत्र समान  केले पाहिजेत , अशी मागणी कोल्हापूर वाहनधारक संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना बुधवारी केली  . या भागातील वाहनधारक सर्रास कर्नाटकात इंधन भरत आहेत . कोल्हापूर – बेंगलोर या मार्गावरील ट्रकच्या एका फेरीला सुमारे ४०० लिटर डिझेल लागते . त्यामुळे वाहनधारकांचे  या एका फेरीला इंधन दरातील फरकामुळे सुमारे १६०० रुपये वाचतात . वाहनधारकांसाठी ही बाब चांगली असली तरी  याचा परिणाम शासनाच्या महसुलावरही होणार असल्याने त्याचा विचार होणे गरजेचे आहे .