अमर रहेचा जयघोष, जवानांनी दिलेली अखेरची मानवंदना, जवळच्या नातलगांचा आक्रोश आणि हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या हुतात्मा संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात संग्राम पाटील नुकतेच हुतात्मा झाले होते. त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांचे मूळ गाव निगवे खालसा येथे आणण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे दर्शन घेताच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी श्रध्दांजलीचे तसेच पाकिस्तानच्या निषेधाचे फलक लावण्यात आले होते. अंत्ययात्रेवेळी दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित नागरिक पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पहार आणि फुले वाहून त्यांना श्रद्धांजली वाहात होते. या वेळी शोकाकुल समुदायातून ‘अमर रहे अमर रहे संग्राम पाटील  अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणाही दिल्या जात होत्या.

अंत्यसंस्कारस्थळी पार्थिव येताच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदींनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. यानंतर पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून संग्राम पाटील यांना अखेरची मानवंदना दिल्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

संग्राम पाटील यांचे घर बांधणार

संग्राम पाटील यांचे घराचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना दिली. ‘मुश्रीफ फाउंडेशन’च्या माध्यमातून आपण हे काम पूर्ण करू असे त्यांनी या वेळी जाहीर केले.

दोन्ही कुटुंबीयांना एक कोटी

शहीद जवान संग्राम पाटील आणि शहीद जवान हृषीकेश जोंधळे यांना देशसेवा बजावताना नुकतेच वीरमरण आले आहे. या दोन्ही सैनिकांच्या पाठीशी शासन उभे आहे. दोन्ही जवानांच्या कु टुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे केली.