22 February 2020

News Flash

कोल्हापुरातील सण-उत्सव साधेपणाने

मंडळे, संस्था अनाठायी खर्च टाळून पूरग्रस्तांचे उद्ध्वस्त संसार उभारणार

|| दयानंद लिपारे

मंडळे, संस्था अनाठायी खर्च टाळून पूरग्रस्तांचे उद्ध्वस्त संसार उभारणार

महापुराने कोल्हापूरचे जनजीवनच अस्ताव्यस्त केले नाही, तर तेथील सांस्कृतिक विश्वावरही खोलवर परिणाम केला. सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यापासून तर ते रद्द करण्यापर्यंतही निर्णय घेतले जात आहेत. अनाठायी खर्चाला बगल देऊन महापुरामुळे उद्ध्वस्त झालेली घरे-दारे आणि पूरग्रस्तांचे संसार उभे करण्याची जबाबदारी मंडळांनी खाद्यांवर घेतली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सल रद्द करण्यात आला आहे. गणेशोत्सवापेक्षा राजकीय टीकाटिप्पणीने गाजणारा आखाडा बंद करण्यात येणार आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय करवीरनगरीने घेतला असला तरी शेजारच्या वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेला नेहमीप्रमाणेच गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे वेध लागल्याने टीका होऊ लागली आहे.

निम्मे कोल्हापूर पंचगंगेच्या जलप्रलयात बुडाले सापडले होते. या संकटाने सामाजिक जाणिवा बदलत आहेत. दु:खातून सावरण्यास बराच अवधी लागणार असून मदत -पुनर्वसन कार्याला आजही अनेकांनी वाहून घेतले आहे. पूरपरिस्थितीला सामोरे जाताना काही विधायक भूमिका घेतली जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सण-समारंभ यातील डामडौल टाळण्यात येणार आहे. त्यातील सर्वात पहिला आणि महत्वपूर्ण ठरलेला निर्णय म्हणजे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे.

गणेशोत्सव २ सप्टेंबरपासून सुरू होत असताना समाज माध्यमातून ‘गणेश उत्सव साधेपणाने साजरा करूया – पुग्रस्तांना मदत करूया’ असे संदेश फिरू लागले आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संदेशांनी अनेक मंडळांना उत्सव साधेपणाने साजरे करण्याची प्रेरणा दिली आहे.

मंगळवार पेठ परिसरातील सुमारे १२५ गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ अनेक पेठा, मंडळे यांनी हाच कित्ता गिरवला. उत्सवाचा झगमगाट, सजावट, देखावे रद्द करून तो निधी पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्सवाच्या तयारीपेक्षा सारा भर पूरग्रस्तांना मदत आणि त्यांचे पुनर्वसन यावर दिला जात आहे. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पोलीस यांच्यातही उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर एकमत झाले असून कोल्हापूरची पुरोगामी विचारधारा सणांच्या माध्यमांतून समाज बांधणीचा संदेश देताना दिसत आहे.

राजकीय आखाडा बंद

कोल्हापूरच्या गणेशोत्सवात देखावे, प्रबोधन, सजावट इत्यादी वैशिष्ठय़ांची चर्चा होत असली तरी २१ फुटी गणेश मूर्ती हेही उत्सवाचे एक आकर्षण आहे. त्यातही चौकातील २१ फुटी गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो. यंदा डामडौलाला बगल देण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष, माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. मंडळाच्या या निर्णयामुळे दरवर्षी बाप्पाच्या साक्षीने रंगणारा राजकीय आखाडा यंदा प्रथमच बंद राहणार आहे. याच मंचावरून माजी आमदार महादेव महाडिक आपली राजकीय दिशा स्पष्ट करताना विरोधकांवर शरसंधान करीत आले आहेत. गतवर्षी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी ‘धनंजय महाडिक नावाचा अश्वमेध मी सोडणार आहे, हिंमत असेल तर त्याचा लगाम धरून दाखवावा, असे आव्हान संजय मंडलिक – सतेज पाटील यांना उद्देशून दिले होते. अर्थात महाडिक यांचा अश्वमेध फसला.

कोल्हापुरात दहीहंडीचा थरार दरवर्षी रंगत असतो. त्यातील सर्वात आकर्षण असते ते धनंजय महाडिक युवाशक्तीचे. पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आणि सर्वाधिक उंची असलेल्या या युवाशक्तीच्या दहीहंडीसाठी गतवर्षी तीन लाखाचे बक्षीस होते. गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचे अनुकरण करीत युवाशक्तीचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी यंदाची दहीहंडी रद्द केली. त्यामुळे शुक्रवारी प्रथमच दसरा चौकात या उत्सवाचा दणदणाट दिसला नाही.

मूर्तिकार कुंभारांना दिलासा

पंचगंगेच्या महापुराचा कुंभार समाजाला मोठा फटका बसला. गणेश उत्सवासाठी कलात्मक, देखण्या मूर्ती त्यांनी घडवल्या होत्या. महापुराने होत्याचे नव्हते केले. कारागीर कुंभार बांधव मोठय़ा संकटात सापडला. अचानक पुराचे पाणी वाढल्याने त्यांना गणेश मूर्ती बाहेर काढता आल्या नाही. यामुळे लाखो रुपयांचा फटका त्यांना बसला. तर, बहुतांशी गणेश मंडळांना यंदा हवी तशी मूर्ती मिळणे अवघड आहे. उद्ध्वस्त झालेल्या कुंभारवाडय़ाला आर्थिक दिलासा देण्यासाठी दानशूर कोल्हापूरकरांचे हात पुढे येत आहेत. कुरुंदवाड येथील कुंभार समाजाला दोन हजार गणेश मूर्ती साकरण्याचे काम मुंबईहून मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

इचलकरंजी पालिकेला उत्सवाची घाई

महापुराच्या प्रलयाने दु:ख पचवून सर्वस्व गमावलेल्यांना उभारी देण्यासाठी कोल्हापूर नगरी एकवटताना दिसत आहे. तर, श्रीमंत नगरपालिका अशी बिरुदावली मिरवणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेला अशा संकटकाळात सणातून निधी मिळवण्याचे वेध लागले आहेत. संकटसमयी इचलकरंजी पालिकेने गणेश उत्सवाचा ठेका देणारी निविदा घाईघाईने काढली आहे. आधीच टक्केवारीच्या अर्थपूर्ण कारभारामुळे इचलकरंजी नगरपालिका राज्यात बदनाम झाली असताना आता तर संकट निवारण करण्याऐवजी उत्सवाची घाई झाली आहे.

संकट काळात तालीम, मंडळांनी मदतीची भूमिका घेतली असून त्याला सर्व घटक प्रतिसाद देत आहेत. महापुराचे संकट असल्याने शहरातील तालीम संस्था आणि मंडळांची गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची भूमिका योग्य आहे.      – संजय मंडलिक, खासदार

First Published on August 24, 2019 1:52 am

Web Title: ganesh chaturthi 2019 in kolhapur mpg 94
Next Stories
1 स्वयंसेवी संस्थांकडून गृहबांधणीसाठी पुढाकार
2 ज्येष्ठ लेखिका आशा आपराद यांचे निधन
3 पूरग्रस्त भागांत मदतीची वाटमारी