16 February 2019

News Flash

वाद्यांच्या गजरात कोल्हापुरात गणरायांचे आगमन

ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा.. मोरयाचा जयघोष करीत गुरुवारी गणरायांचे शहरात आगमन झाले.

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणरायांचे कोल्हापूर शहरात आगमन झाले. (छाया - राज मकानदार)

ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा.. मोरयाचा जयघोष करीत गुरुवारी गणरायांचे शहरात आगमन झाले. आद्यपूजेचा मान असणाऱ्या  लाडके दैवताचे स्वागत करण्यासाठी आबालवृद्धांसह सर्वत्र उत्साह संचारला होता. वाहतूक कोंडीमुळे काही मार्गावरील वाहतूक बंद केली. दुपारनंतर सार्वजनिक मंडळाच्या श्रींच्या गुलालाच्या उधळणीत जल्लोषात मिरवणुका काढण्यात आल्या.

लाडक्या गणरायाला नेण्यासाठी सकाळपासूनच गणेशभक्तांनी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. आबालवृद्ध डोक्याला भगवी पट्टी बांधून ढोल-ताशांच्या निनादात नाचत होते. सकाळी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना झाली. शहरातील अनेक अपार्टमेंटमध्ये सर्वच नागरिकांनी एका हातगाडीवर सर्वांचे घरगुती गणपती ठेवून समूहाने ढोल-ताशांच्या गजरात गणेश आगमन मिरवणूक काढली. या मिरवणुकीत लहान थोरांसह, मुली, महिलांनीही मोठा सहभाग घेतला होता.  घरगुती गणेशमूर्तींच्या आगमनानंतर केलेल्या सुंदर सजावटीतील मखरात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. मोरयाच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

आज घरोघरी  गणेशमूर्तीची मनोभावे पूजा करण्यात आली. दूर्वा, लाल फुले, गेजवस्त्र अर्पून गणेशाला पूजण्यात आले. गणेशाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक, गव्हाची खीर असा नैवेद्य केल्याने त्याचा घमघमाट जाणवत होता. यंदा घरगुती बाप्पांचा मुक्काम फक्त पाचच दिवस असणार आहे. गणेशोत्सवाचे हे पाचही दिवस लगबगीचे आहेत. शनिवारी गौराईचे तर रविवारी शंकरोबाचे आगमन होऊन पूजन होईल. सोमवारी  बाप्पा व गोराईंचे विसर्जन होईल.

रस्ते वाहतुकीसाठी बंद

दुपारपासूनच कुंभार गल्लीमध्ये गर्दी वाढू लागली. सर्वाधिक गर्दी होणाऱ्या  पापाची तिकटी ते गवळी गल्लीपर्यंतचा मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता. दुचाकी वाहनं जोशी गल्ली कॉर्नरपासून तेली गल्लीकडे वळवली आहेत.

मंडळाच्या भव्य मिरवणुका

दुपारी चारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मूर्ती प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. वाजतगाजत मिरवणुकांचे चित्र शहराच्या सर्वच भागात दिसून येत होते. बागल चौक परिसरात यंदा नव्याने आलेल्या गणेशाचे चित्र असलेले टी शर्टवर गणेशाच्या विवध रूपातील चित्रे आहेत. श्री गणेशाय नम:, मोरया, श्रीमंत असे लिहिले आहे. त्यामुळे हे टी शर्ट आकर्षण ठरत आहेत.

First Published on September 14, 2018 12:28 am

Web Title: ganesh chaturthi festival 2018 11