२२ तास गणेश विसर्जन मिरवणूक

‘वाजत, गाजत, नाचत, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत कोल्हापुरात गणरायाला उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. शहरात तब्बल २२ तास गणेश विसर्जन मिरवणूक चालली. डीजे शिवाय विसर्जन मिरवणूक पार पडली. त्याचा आनंद जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यसह पोलिसांनी नृत्य  करून व्यक्त केला.

गणेश विसर्जन मिरवणुकीला कोल्हापूरचा मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजनाने सुरवात होते. पालखी पूजन आणि श्रींची आरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर मिरवणुका  काढून तरुण मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.  ढोल ताशाचा ठेका व लेसर शोच्या झगमगाटात रात्रभर  महाद्वार रोड गर्दीने फुलून गेला. रात्री दोन वाजता पाटाकडील तालीम मंडळाची मिरवणूक आल्यावर  उत्साहाला उधाण आले. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, उमेश कांदेकर युवा मंच, दिलबहार तालीम मंडळ, पी. एम. बॉईज, अवचितपीर, वेताळ तालीम, बालगोपाल, बागल चौक मंडळाच्या मिरवणुकांनी हजारो भाविकांची गर्दी खेचून धरली.

लोकप्रतिनिधींचा मिरवणुकीत सहभाग

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीत दरवर्षी लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो. यंदाही हे चित्र कायम होते.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरच लेझीमचा ताल ठरला.  खासदार धनंजय महाडिक यांनी हलगी वाजविली. आमदार सतेज पाटील,  आमदार राजेश क्षीरसागर यांनी  मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत नृत्याचा फेर धरला. सामाजिक कार्याला गती, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून अथकपणे  सुरू होत्या. ‘व्हाईट आर्मी’ चे स्वयंसेवक मिरवणूक मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत होते.

गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

महापालिकेच्या मूर्तिदान आवाहनास सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद देत ७१५ मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. यामध्ये पंचगंगा घाट (१०६), राजाराम बंधारा व बापट कॅम्प (५९ ), कोटीतीर्थ तलाव व राजाराम तलाव (१६९), इराणी खण (३८१) यांचा समावेश होता .

चोख पोलीस बंदोबस्त

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. मिरवणुकीवर १६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिळणाऱ्या चलचित्रांवरही पोलिसांची बारीक नजर होती. पंचगंगा नदी घाट, इराणी खण आदी विसर्जन ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. संपूर्ण मिरवणूक मार्गावर पोलिसांची करडी नजर होती.