नेहमी टीकेचे धनी बनणाऱ्या कोल्हापूर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वाटय़ाला आता कौतुकाचे शब्द येऊ लागले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना सफाई कर्मचारी धैर्याने कर्तव्य बजावत असल्याने पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले आहेत. त्यांनी बुधवारी या कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून आणि गळ्यात नोटांची माळ घालून कृतज्ञता व्यक्त केली.

कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शहर स्वच्छ केले जाते. रस्त्याची सफाई, गटारी स्वच्छ करणे, सारण गटार स्वच्छ करणे, रासायनिक द्रव्यांची फवारणी अशी विविध प्रकारची कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्यांच्या कामाबद्दल सहसा लोकांमध्ये तक्रारीचा सूर असतो.

आता करोनाच्या साथीमध्ये शेकडो कर्मचारी सकाळी दिवस उजाडल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत सातत्याने आपली सेवा कर्तव्यभावनेने पार पाडत आहेत. करोनाचा धोका असतानाही त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निष्ठेने पार पाडत आहेत. याचे बारकाईने अवलोकन गल्लीबोळात राहणारे नागरिक करीत आहेत. या कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा आणि धाडस यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विषयी कौतुकाचे बोल ऐकू येत आहेत. नागरिकांकडून बहुधा आरोग्य सेवा, पोलीस यांच्यावर कौतुकाचा वर्षांव सुरू असतो. आता या कर्मचाऱ्यांविषयीही कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

 नोटांची माळ, पुष्पहार आणि भगवा फेटा

केवळ बोलकी कृतज्ञता व्यक्त न करता कोल्हापूरकरांनी या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे. तीही साध्यासुध्या पद्धतीने नव्हे तर त्यांच्या गळ्यात नोटांची माळ, पुष्पहार घालून आणि भगवा फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी मार्केट यार्ड प्रभागातील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. ‘आरोग्य विभागाकडील घंटागाडी व झाडू कामगार यांनी चांगले काम केले आहे. तळागाळात या कामाची दखल घेऊन कौतुक केले जात नाही. सामाजिक जाणीव म्हणून या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे,’ असे सांगत नगरसेविका सुरेखा शहा यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

या अनोख्या सत्काराने कर्मचारीही भारावून गेले. करोनाचे संकट दूर होईपर्यंत अहोरात्र सेवा बजावण्याचा निर्धार त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. महालक्ष्मी व मंगेशकर प्रभागातील नागरिकांनी या कर्मचाऱ्यांचा शाल देऊन व पुष्पवृष्टी करून सन्मान केला होता. शहरात अशाप्रकारे विविध ठिकाणी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जात असल्याने त्यांनाही आपले कर्तव्य बजावण्यासाठी अंगावर मूठभर मास चढण्याचा आनंद होत आहे.