कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आता जलवाहिनीद्वारे सर्वसामान्यांना गॅस मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुस’ होणार असून विशेष: गृहिणींची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.

शिरोली एमआयडीसीमध्ये शहर गॅस वितरण (सीजीडी) गॅस पाईपलाइन प्रकल्पासाठी पाईपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे चर्चेत असणारा हा प्रकल्प कोल्हापूरमध्ये सुरु होत आहे. या प्रकल्पामुळे वाहनांच्या इंधन खर्चावरील किंमत निम्यावर येईल. प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपणा सर्वानी प्रयत्न करायचे आहेत.

संभाजीराजे म्हणाले, की दाभोळवरून बेंगलोरपर्यंत गॅस पाईपलाइन गेली आहे. ३८ हजार कनेक्शन युध्दपातळीवर देण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी सोडवू.

एचपी ऑईल गॅस प्रा.लि. चे प्रकल्प प्रमुख सुनील सदमाके यांनी प्रास्ताविक केले. शिरोली एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील, गेल इंडियाचे उप महाप्रबंधक पी. राजकुमार, व्यवस्थापक हेमंत कुमार आदी उपस्थित होते.