20 September 2020

News Flash

सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइन

खतनिर्मिती क्षेत्रात सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इफको’ संस्थेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील सहकारी संस्थांच्या मागणीवरून सहकार विभागाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी पुढील वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र करोनाचा कहर कमी होण्याची चिन्हे नसल्याने आगामी मार्चपर्यंत तरी वार्षिक सभा कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर आहे. अशा अडचणीच्या काळात ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण वार्षिक सभा घेण्याचा एक पर्याय पुढे आला आहे. खतनिर्मिती क्षेत्रात सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इफको’ संस्थेची सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली असता देशभरातील शंभराहून अधिक ठिकाणच्या सभासदांनी सहभाग घेतला. या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सहकारी सहकारी संस्थांमध्ये अशा पद्धतीने वार्षिक सभा घेणे सुलभ ठरेल आणि कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळता येईल, अशा स्वागतार्ह प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

राज्यभरात करोना संक्रमण वाढत चालल्याने अनेक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. देशात सहकाराचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात आहे. राज्यात सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन अडचणीत सापडलेले आहे. सहकार कलम ८१ मधील तरतुदीनुसार ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपले की पुढील चार महिन्यात लेखापरीक्षण बंधनकारक आहे. करोनामुळे लेखा परीक्षण करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याने विहित कालावधीत हे काम होणे शक्य नसल्याचे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सहकारी संस्थांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार सहकार विभागाने आता ३१ डिसेंबपर्यंत लेखा परीक्षण करण्यास मुदत दिली असून ३१ मार्च २०२१ पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. यामुळे सहकारी संस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘इफ्को’चे पहिले पाऊल

अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा एक पर्याय पुढे आला आहे. ‘इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लि.) या संस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. देशभरामध्ये ११४ ठिकाणांहून इफ्कोच्या १ हजार आमसभा सदस्यांपैकी ७८६ आमसभा सदस्यांनी सहभाग घेतला. ऑनलाइन सभा चार तास कोणतीही तांत्रिक अडचण न येता सुरळीतपणे पार पडली’, अशी माहिती इफ्कोचे कोल्हापूर जिल्हा क्षेत्र अधिकारी विजय बुणगे यांनी दिली.

आयोजनात अडचणी

तथापि, करोनाचा संसर्ग इतक्यात संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने लेखापरीक्षण पूर्ण झाले तरी वार्षिक सर्वसाधारण सभा कशा प्रकारे पार पडायची याचा प्रश्न सहकारी संस्थांसमोर आहे. साखर कारखाने, दूध, सूतगिरण्या, बँका यांसारख्या मोठय़ा सहकारी संस्थांचे हजारो सभासद असतात. राज्यात सर्वात मोठी सहकारी दूध संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाची सभा तर गेली काही वर्षे सातत्याने हाणामारी होतच पार पडली आहे. अनेक साखर कारखाने, सूतगिरण्या बँका यांच्या सभेतही वादावादी जणू ठरलेलीच. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत हाणामारीचा आखाडा रंगलेला असतो. या पार्श्वभूमीवर हजारो सभासदांना एकत्रित आणून सभा पार पडणे हे करोना संसर्गात सहकारी संस्थासमोर एक दिव्य आहे.

अनुकरणीय उपक्रम -गणपतराव पाटील

शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव पाटील यांनीही सभेचा अनुभव सुखद असल्याचे सांगितले. करोना संसर्गाच्या काळात इच्छुक असणाऱ्या सर्व सभासदांना सभेसाठी एकत्रित आणणे हे सोपे असणार नाही. अशावेळी ऑनलाइन पद्धतीने सभा घेणे हा एक चांगला पर्याय आहे. आजच्या इफ्कोच्या सभेमध्ये सभासदांना व्यवस्थित प्रश्न विचारण्याची सोय होती. संस्थाचालकांनीही त्याची उत्तरे व्यवस्थित दिली. हा समाधानकारक अनुभव असून सहकारी संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे निष्टिद्धr(१५५)तच योग्य ठरेल. त्यासाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. संस्था कार्यक्षेत्रात पडद्याची  सोय करून त्याआधारे प्रश्नोत्तरे, संवाद घडवून वार्षिक सभा सुरळीत पार पाडणे हा पर्याय योग्य आहे, असे पाटील म्हणाले. करोना काळात शासनानेही व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे असा काही प्रयत्न झाल्यास त्याला शासनाचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2020 12:15 am

Web Title: general meetings of cooperatives online abn 97
Next Stories
1 ‘अलमट्टी’ची उंची वाढवल्याने महाराष्ट्रावर अन्याय होणार असेल तर आंदोलनही करु – चंद्रकांत पाटील
2 शिवपुतळ्यासाठी शिवसेनेचे बेळगावात आंदोलन
3 कोल्हापूर : शिवसेनेच्या खासदाराला करोनाची लागण; पत्नी व मुलगाही पॉझिटिव्ह
Just Now!
X