21 November 2019

News Flash

कोल्हापुरी चप्पलच्या भौगोलिक मानांकन दर्जावरून वाद

कोल्हापुरी चप्पलला  भौगोलिक उपदर्शन दर्जा (जीआय मानांकन) मिळाले आहे

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापुरी चप्पलला  भौगोलिक उपदर्शन दर्जा (जीआय मानांकन) मिळाले आहे. कोल्हापुरी चप्पलची अस्सलता जाऊन बनावट दर्जाच्या चपला ग्राहकांच्या माथी मारल्या जातील, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. कोल्हापूर वगळता अन्य ठिकाणी लादलेला भौगोलिक उपदर्शन दर्जा काढून घ्यावा अशी मागणी कोल्हापुरातील चप्पल उद्योजकांनी बुधवारी केली.

कोल्हापूर म्हटले डोळ्यासमोर येते कोल्हापुरी चप्पल. प्राचीन इतिहास असलेला हा उद्योग राजर्षी शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे खूपच विस्तारला. कोल्हापुरी चप्पलांची खासियत आहे. अनेक पिढ्या वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने चपला बनवण्याचे काम करतात. अशा या कोल्हापुरी चपलांना ‘भौगोलिक उपदर्शन दर्जा’ ( जिऑलॉजिकल इंडेक्स) मिळाला आहे. मात्र ती जन्मते त्या कोल्हापूरच्या भूमीतच विरोध होत आहे.

महाराष्ट्रातील संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम) आणि कर्नाटकातील डॉ. बाबू जगजीवनराम चर्मोद्योग विकास महामंडळ (लिडकार) यांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नामुळे  भौगोलिक उपदर्शन दर्जा प्राप्त झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर हे महाराष्ट्रातील आणि बेळगाव, बागलकोट, धारवाड, विजापूर हे कर्नाटकातील चार जिल्ह्यांसाठी हे मानांकन मिळाले आहे.

‘या निर्णयामुळे कोल्हापुरी चप्पलचा अस्सलपणा पुसला जाऊन निकृष्ट दर्जाच्या चपला कोल्हापुरी नावाने विकल्या जातील. हा निर्णय कोल्हापुरातील चर्मकार हणून पाडतील. याला न्यायालयात आव्हान देणार आहोत,’ असे चप्पल व्यावसायिक, उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले. कोल्हापूर चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी ‘लिडकॉम आणि लिडकार यांनी कोल्हापूरची ओळख पुसून काढण्याच्या प्रकाराला विरोध केला जाईल,’असे सांगितले.

First Published on June 19, 2019 9:59 pm

Web Title: gi rating for kolhapuri chappal
Just Now!
X