कळे (ता. पन्हाळा) येथील चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणा-या बारक्या उर्फ सचिन पांडुरंग पाटील (वय २१ ) या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी १० वष्रे सक्तमजुरी व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. १५ हजारांची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. अ‍ॅड. सुजाता इंगळे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
कळे येथील मरगु मंदिरानजीक असणा-या एका अंगणवाडीमध्ये चार वर्षांची मुलगी शिक्षण घेत होती. तिचे वडील नोकरीनिमित्त कोल्हापुरात येत असत. २३ सप्टेंबर २०१४ रोजी पीडित मुलीच्या आईने तिला नेहमीप्रमाणे अंगणवाडीमध्ये सोडले. दुपारी आई नेण्यास आली असता संबंधित मुलगी रडत आल्याने तिला कळे येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता सीपीआर रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णालयात तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. यानुसार याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल करून सचिन उर्फ बारक्या पांडुरंग पाटील याला अटक करण्यात आली.
या खटल्याच्या कामी सरकारी वकील अ‍ॅड. सुजाता इंगळे यांनी १७ साक्षीदार तपासले, पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे, पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मधुकर सुतार, पोलीस उपनिरीक्षक मारुती कांबळे यांच्या साक्षी ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी सचिन पाटील यास १० वष्रे सक्तमजुरी व पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली.