News Flash

कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचे आकर्षण असलेली ‘मेबॅक’!

राजघराण्यात या मोटारींविषयी भरभरून बोलले जाते. 'मेबॅक झेपलिन' असे नाव असलेली ही भारतात उपलब्ध असणारी एकमेव मोटर आहे.

|| दयानंद लिपारे

कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचे आकर्षण असलेली ‘मेबॅक’ या वर्षी ८८ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. १९३२ पासून प्रत्येक दसऱ्याला राजघराण्यातील मंडळींना  घेऊ न येणारी मेबॅक ही ऐटबाज मोटार दसरा सोहळ्याची अमीट ओळख बनली आहे. एक-दोन नव्हे, तर पाच पिढयांना साथ करणारी ही मोटार इतक्या वर्षांनंतर आजही आपला बाज राखून आहे. जवळपास ९० वर्षे या मोटारीने एकदाही त्रास न देता राजघराण्याची अहर्निश सेवा बजावली आहे. ती जशी राजघराण्याची शान आहे, तद्वत करवीरकरांची लाडकी आहे.

देशात मोजक्या शहरात शाही दसरा होतो. त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. कोल्हापूर संस्थानाचे सामथ्र्य दाखवणारी शाही मिरवणूक आणि त्यातील शाही सोहळा ही जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी वाजत गाजत अनेक वैशिष्टये सामावलेली मिरवणूक निघताना अवघे कोल्हापूर रस्त्यावर लोटलेले असे. त्यातील एक खासियत म्हणजे शतकभरापूर्वी ‘जंगबहाद्दुर’ नावाचा हत्ती कोल्हापूरच्या शाही दसरम्य़ाच्या मिरवणुकीत सर्वात पुढे असायचा. जंगबहाद्दुर नंतर ही जागा ‘मेबॅक’ या आलिशान जर्मन बनावटीच्या मोटारीने घेतली. १९३२ पासून दसऱ्याला राजघराण्यातील मंडळींना घेऊ न येणारी मेबॅक आजही पूर्वीइतकीच शानदार आणि लोकप्रियही आहे .

राजघराण्यात या मोटारींविषयी भरभरून बोलले जाते. ‘मेबॅक झेपलिन’ असे नाव असलेली ही भारतात उपलब्ध असणारी एकमेव मोटर आहे. सद्यस्थितीत जगभरात या मोटारी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. मेबॅक कडून केवळ १०० मोटारीचे उत्पादन करण्यात आले होते. तेव्हा खरेदीदाराची ऐपत पाहिली जात असे. निवडक राजघराणी, सुलतान राष्ट्राध्यक्ष, लष्करशहा आदींची उंची मोजून मोटार विकली गेली.

कोल्हापुरी संस्थानाची वैशिष्टे

कोल्हापुरात या मोटारीचे आगमन झाले ते १९३२ साली. छत्रपती राजाराम महाराज यांनी ही मेबॅक मोटार खास ऑर्डर देऊ न लंडनमधून खरेदी करताना काही खासियत बनवून घेतली. कोल्हापूर संस्थानाच्या ध्वजाचा रंग केशरी, म्हणून मोटारीचा रंगही तोच. त्यावरील ध्वजही केशरी. संस्थानाचे चिन्ह भवानी आणि शिवराय; ते  हेडलाईटवर बसवले गेले. बॉनेटच्या पुढे महालक्ष्मी मूर्ती तयार करवून घेतली. सात प्रवासी वाहून नेऊ शकणाऱ्या या गाडीसोबत जादाचा टायर आला होता, तो ७० वर्षांनंतर उघडण्यात आला. सध्या आहे तेच टायर आहेत. गाडीची एकदाही दुरुस्ती करावी लागली नाही. सुस्थितीत आणि दुर्मीळ असूनही ही मोटार कोणत्याही प्रदर्शनाला (विंटेज रॅली) कधीही पाठवली नाही. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात या मोटारीची किंमत सुमारे ४० कोटी असावी.

मेबॅक आणि छत्रपती घराण्याची पाचवी पिढी

शाही दसरा आणि मेबॅक यांचे दशकानुदशके अतूट समीकरण बनले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या पाच पिढय़ा या मोटारीतून सुखनैवपणे प्रवास करीत आल्या आहेत. राजाराम महाराजांच्यापासून सुरु झालेला प्रवास पुढे शहाजी महाराज , श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे आणि शहाजीराजे, यशराजे, यशस्विनीराजे यांच्यापर्यँत सुरूच आहे. संभाजीराजे, मालोजीराजे यांच्या विवाहाची वरात याच मोटारीतून निघाली होती. विशेष म्हणजे मेबॅकची काळजी राजघराणे कुटुंबातील सदस्याप्रमाणे घेतात.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 3:47 am

Web Title: glory royal dash maybach akp 94
Next Stories
1 केवळ हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक – शरद पवार
2 फक्त हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक – शरद पवार
3 कोल्हापुरात जनसुराज्यच्या नथीतून भाजपचा शिवसेनेवर तीर
Just Now!
X