करोना नियमावलीचा फज्जा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या गोकुळ दूध संघासाठी रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. मतदानाच्या प्रतिसादावरून दोन्ही आघाडय़ांत विजयाचे दावे करण्यात आले. सत्तारूढ गड राखणार की विरोधक बाजी मारणार हे लक्षवेधी बनले असून ४ मे रोजी मतमोजणीतून निकाल स्पष्ट होणार आहे.

राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी करोना संसर्ग फैलावत असतानाही प्रचाराचा धुरळा उडाला होता. आज जिल्ह्यातील ७० मतदार केंद्रांवर मतदान पार पडले. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. मतदानासाठी सत्तारूढ आणि विरोधी दोन्ही आघाडय़ानी शक्तिप्रदर्शनावर भर दिला होता. करवीर  तालुक्यात सर्वाधिक मतदान आहे.  येथील ६४१ पैकी ४५० उमेदवार सोबत आणले असल्याचा दावा विरोधी गटाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतसोबतही मोठय़ा संख्येने ठराव धारक प्रतिनिधी आले होते. विरोधकांनी प्रतिनिधींना पिवळी टोपी, मुखपट्टी. मफलर घातली होता. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शक्तिप्रदर्शन करीत मतदान केंद्र गाठले.  सत्तारूढ गटाने पांढरी टोपी, मुखपट्टी, मफलर अशी तयारी केली होती.

यशाचे दावे प्रतिदावे

सतेज पाटील म्हणाले, गोकुळमधील गैरकारभाराचा पंचनामा मतदारांना पटल्याने ते मोठय़ा संख्येने आमच्यासोबत राहिले आहेत. आमच्या आघाडीला निश्चितपणे कौल मिळेल.  गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार पी.  एन.  पाटील म्हणाले, गोकुळ चांगलं चाललंय या आमच्या प्रचाराला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. गोकुळची प्रगती होईल या आमच्या प्रचाराला प्रतिसाद मिळाला असल्याने सत्ता आमचीच येईल.

करोना नियमाची पायमल्ली

करोना संसर्ग  वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने मतदान केंद्र दुप्पट करण्याचे आदेश दिले होते. आज मतदानावेळी करोना नियमावली धाब्यावर बसवली गेली. उभय गटाच्या नेत्यांनीच गठ्ठा मतदान आपल्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. यात सामाजिक अंतर नियमाचा पुरता फज्जा उडाला.  आधीच करोनामुळे गोकुळच्या तीन ठरावधारक प्रतिनिधींचा मृत्यू झाला आहे. आजची उसळलेली गर्दी पाहता आणखी फैलाव होण्याची शक्यता दिसत आहे. या प्रकारावर समाज माध्यमातून टीकेची झोड उठवली गेली. सामान्यांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना सवलत यावरून टिपणी केली गेली.