News Flash

‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांची पिळवणूक – सतेज पाटील

लिटरला २७ रुपये दर शक्य असतानाही शेतकऱ्यांना नागवले जात आहे.

गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी गायीच्या दूध खरेदी दर कपातीचे समर्थन केले असताना आता विरोधकांनी याच मुद्दय़ावरून दुधाला राजकीय उकळी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. गोकुळने केलेली दरकपात दुर्दैवी आहे. लिटरला २७ रुपये दर शक्य असतानाही शेतकऱ्यांना नागवले जात आहे. गोकुळ दूध संघाची सत्तासूत्रे व्यापारी मंडळींच्या हाती गेल्याने दूध उत्पादकांची पिळवणूक होत आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केली.

सोमवारी सायंकाळी गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ) मधील  विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांच्या बठकीत त्यांनी पुन्हा एकदा संचालक मंडळाला टीकेचे लक्ष्य केले. यावेळी आमदार पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी वायफळ खर्च टाळला पाहिजे. एकीकडे दर कमी करून शेतकऱ्यांचा खिसा रिकामा केलाच पण त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीसुविधा मात्र अखंडित वाढविल्या आहेत. संचालकांनी आपल्या आलिशान वाहनांवर  करण्यात येणारा लाखो रुपयांचा खर्च कमी केला तरी दुधाला २७ रुपयांपेक्षा पेक्षाही अधिक  दर देता येणे शक्य आहे. हे करणे राहिले बाजूला उलट दूध दरकपातीच्या बठकीसाठी शेतकऱ्यांचा कैवार घेणाऱ्या गोकुळने पुढाकार घेणे ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशी टीका त्यांनी केली.

गोकुळ दूध संघ विरोधातील आपला लढा अधिक आक्रमक करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला. गोकुळ संघाने केलेली दर कपात ही कुणाच्या सांगण्यावरून केली आहे, हे जिह्य़ाला माहीत आहे, असे म्हणत आमदार पाटील यांनी गोकुळचे सर्वेसर्वा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता रस्त्यावर उतरत आहोत. गोकुळचा कारभार व्यापाऱ्यांच्या हातात असल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होत असल्याने याला वाचा फोडण्यासाठी  सोमवारी (२७ नोव्हेंबर) गोकुळ कार्यालयावर  मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी ५ हजार दूध संस्थांच्या प्रतिनिधींची  गावोगावी जाऊन जागृती करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या वेळी बाबासाहेब देवेकर, किशोर पाटील, सदाशिव चरापले, शशिकांत खोत, प्रदीप झांबरे आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:22 am

Web Title: gokul dairy producer satej patil
Next Stories
1 शालेय पोषणआहार योजनेत घोटाळा
2 देशभरातील शेतकरी सोमवारी दिल्लीत एकत्र!
3 बेळगाव वेषांतर..शरद पवार ते जयंत पाटील
Just Now!
X