News Flash

‘गोकुळ’ची निवडणूक अटळ

प्रथमच पक्षीय पातळीवरील रणसंग्राम

(संग्रहित छायाचित्र)

सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघ या मलईदार संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक अटळ ठरली आहे. या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडीचा राजकीय चेहरा लाभत आहे. तीन मंत्री, दोन खासदार काही आमदारांनी या प्रक्रियेत गुंतले आहेत.

सत्तारूढ गटाने ही निवडणूक पक्ष स्वरूपात न लढता आघाडी स्वरूपात लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या आखाड्यात आता सामना रंगणार हे निश्चित झाले असून राज्यातील सर्वांत मोठ्या या सहकारी दूध संघांवर कोणाचे वर्चस्व राहणार याचा फैसला होणार आहे.

गोकुळ दूध संघाची ख्याती संपूर्ण राज्यभर आहे. संघाने दुग्ध व्यवसायात नाव कमावले आहे. ही जमेची बाजू आहे. गोकुळबाबतीत आणखी एक आकर्षणाची किनार म्हणजे संस्थेचे संचालकपद. इथे संचालक असणे हे लोकप्रतिनिधीपेक्षाही अधिक ‘मोलाचे’ आहे, असे मानले जाते. त्यातून संचालक मंडळात स्थान मिळण्यासाठी जिल्ह्याातील तमाम नेत्यांचा प्रयत्न सुरू असतो. तर या संस्थेवर आपले वर्चस्व निर्माण होण्यासाठी बड्या नेत्यांचा आटापिटा सुरू असतो.

गेली काही वर्षे गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके यांचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीत महाडिक हे निवडणूक आणि जागावाटपाच्या चर्चा प्रक्रियेपासून दूर आहेत. आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे सूत्रे सोपवली आहेत. नरके यांचे स्थान डळमळीत असल्याचे दिसते. महाडिक-पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे गोकुळविरोधी कृती समितीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील करीत आहेत. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी गटासाठी वजन वापरले होते.

बदललेली समीकरणे

या निवडणुकीत मात्र चित्र बदलले आहे. गोकुळ निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच्या मुश्रीफ-पी. एन. पाटील यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्यात जमा असून निवडणूक जवळपास अटळ आहे. या निवडणुकीची दोन मुख्य वैशिष्ट्ये दिसत आहेत. मुख्य म्हणजे निवडणूकविरोधी गटाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची पक्षीय मोट बांधली जात आहे. दुसरे, या वेळी सतेज पाटील, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना मुश्रीफ यांची साथ लाभत आहे. गतवेळी मुश्रीफ गटाची मते निर्णायक ठरली होती. तेव्हा जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील असल्याने त्यांची ताकद महाडिक यांना मिळाली होती. सतेज पाटील विरोधी बाकावर होते. आता चित्र नेमके उलटे आहे. पाटील- मुश्रीफ यांच्याकडे मंत्रिपद आले आहे. संजय मंडलिक हे खासदार बनले आहेत. शिवसेनेची साथ मिळवण्याचे प्रयत्न असल्याने आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांची सोबत मिळू शकते. संचालक मंडळात शिवसेनेचे दोन संचालक असल्याने त्यांची ताकद महाविकास आघाडीकडे आल्यास आघाडीला बळ मिळून नाराज व कुंपणावरील संचालक इकडे वळू शकतात. गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ बहुराज्य, दूध दर, संचालकांचे अवाढव्य खर्च, गैरव्यवहार याविरोधात गोकुळविरोधी कृती समितीने आवाज उठवला असल्याने कारभारावर नाराज असलेल्या दूध संघांची मते मिळण्याची आशा आहे. या टप्प्यावर आघाडी बलिष्ठ असल्याचे चित्र आहे.

ठराव निर्णायक

या निवडणुकीत कोणता नेता कोणाकडे आहे. ती पक्षीय स्वरूपात होणार की कसे? यापेक्षा प्राथमिक दूध संघाचे ठराव कोणाकडे किती आहेत हे निर्णायक ठरणार आहे. ठराव दाखल करण्यात सत्तारूढ गटाने आघाडी घेतल्याचा महाडिक-पाटील यांचा दावा आहे. खेरीज, सत्तेत असल्याने गोकुळला दूध घालणाऱ्या गावोगावच्या प्राथमिक दूध संघाशी संपर्क चांगला आहे. दुधाला अधिक दर, गतिमान प्रशासन, वाढती उलाढाल या जमेच्या बाजू असल्याचा प्रचारही त्यांनी खेडोपाड्यात सुरू केला आहे. चंद्रकांत पाटीलसह भाजपची साथ मिळणार आहे. परिणामी, महाविकास आघाडीकडे नेत्यांचे जाळे असते तरी दूध संघांचे ठराव असणारे प्रतिनिधी कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकणार यावरच गोकुळचा भावी सत्तारंग निश्चित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 12:16 am

Web Title: gokul election is inevitable abn 97
Next Stories
1 सीमाभागात पुन्हा धगधग
2 वस्त्रोद्योगाकडे शासनाचे दुर्लक्ष
3 करोना साहित्य खरेदीत घोटाळा
Just Now!
X