दयानंद लिपारे

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत रंग भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. सत्तारूढ आघाडीला विरोधकांनी जबर आव्हान दिले आहे. गोकुळला वैभव प्राप्त करून देण्याबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर दोन रुपये अधिक देण्याचा समान कार्यक्रम दोन्ही आघाड्याकडे असल्याने संस्था ठरावधारक कोणाच्या बाजूने मतदान करणार याची उत्सुकता आहे. गोकुळला वैभवाच्या शिखरावर नेल्याचा दावा करणाऱ्या सत्तारूढ गटाच्या बाजूने मतदाराचा कल राहणार की तेथील भ्रष्टाचारावर प्रहार करीत या संस्थेला देश पातळीवरील संस्था बनवण्याचा विरोधकांच्या दाव्याच्या बाजूने कौल दिला जाणार हे लक्षवेधी ठरले आहे. मोजकेच मतदार असल्याने प्रचाराच्या मुद्द्याबरोबरच मतदाराची सर्वार्थाने बडदास्त करण्याला खरा ‘अर्थ’ प्राप्त झाला आहे.

गोकुळ दूध संघावर काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके या त्रयींचे २५ वर्षाहून अधिक काळ अबाधित वर्चस्व राहिले आहे. त्यांना गेल्या निवडणुकीत सतेज पाटील, संजय मंडलिक यांनी आव्हान दिले होते. दोन उमेदवार निवडून आले, उर्वरित उमेदवार थोडक्या मताने पराभूत झाल्यामुळे पराभूत होऊनही विरोधकांचा आत्मविश्वाास दुणावला. गोकुळमधील गैरव्यवहार, वासाच्या दुधावरून दूध संघांची अर्थकोंडी, संचालकांची उधळपट्टी, टँकर ठरावीक लोकांकडे असणे असे मुद्दे सातत्याने लावून धरले होते. दोन वर्षांपूर्वी गोकुळच्या वार्षिक सभेत संघ बहुराज्य करण्याचा ठराव आणल्यावर तर विरोधकांनी या विरोधात रान उठवले. परिणामी सत्ताधाऱ्यांच्या बुलंद किल्ल्याला तडे जाताना दिसू लागले. आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. करोना संसर्गामुळे निवडणुकीत अडथळा येत आहे. उच्च न्यायालयातून प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून २६ तारखेला न्यायालयाच्या निकालावर निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

महाडिकांच्या राजकीय भवितव्याची लढाई

गोकुळच्या माध्यमातून आपले राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी सत्तारूढ गटाचे प्रयत्न जारी आहेत. सत्ताधाऱ्यांना आव्हान देत विरोधकांनी या गडावर आपला झेंडा पुरवण्याच्या दृष्टीने हालचाली आरंभल्या आहेत. यातूनच गेले महिनाभर उमेदवार तारेवरची कसरत सुरू होती. अनेक बड्या नेत्यांना नाखूश करीत दोन्ही आघाड्यांनी मंगळवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये १२ संचालक आहेत. चेतन नरके यांच्यारूपाने आश्वाासक चेहरा दिला आहे. या संचालकांचा महाडिक, पाटील, नरके यांचा गोकुळच्या दूध संघांशी अनेक वर्षांचा संबंध असल्याचा मतांची चांगली बेगमी केली आहे. गोकुळ सातत्याने चांगला आणि नेहमी दर देत असल्याच्या त्यांच्या प्रचाराला मतदारांच्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे. आघाडी भक्कम होण्यासाठी प्रथमच महाडिक कुटुंबातील उमेदवारी पुढे केली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना उमेदवारी देऊन आघाडीला भक्कम करण्याला सत्तारूढ गटाने प्राधान्य दिले आहे. गोकुळ वगळतामहाडिक परिवाराकडे एकहि सत्तेचे- लोकप्रतिनिधींचे पद नाही. यामुळे काहीही करून गोकुळचे सत्तास्थान टिकवण्यावर त्यांचे राजकीय अस्तित्व तसेच आगामी कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणुकीचा रंगही अवलंबून असणार आहे. याची जाणीव ठेवून महाडिक, पाटील, नरके यांनी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.

प्रबळ विरोधक

गोकुळच्या निवडणुकीत विरोधक प्रथमच प्रबळ दिसत आहे. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीन मंत्र्यांसह संजय मंडलिक धैर्यशील माने हे शिवसेनेचे दोन खासदार यांनी विरोधी गटाचे नेतृत्व केले आहे. शिवाय अर्धा डझन आमदारांची त्यांना सोबत मिळाली आहे. सत्तारूढ गटाला धक्का देऊन चार विरोधकांना सोबत आल्याने त्यांची उमेद वाढली आहे. गोकुळ मधील गैरव्यवहाराच्या गैरव्यवहार कारभारावर प्रहार सुरू ठेवतानाच गोकुळ आमच्याकडे सोपविल्यानंतर त्याचे सोने करून दाखवू अशी खात्री ते मतदारांना देत आहेत. यातून त्यांना सत्तांतर होण्याचा आत्मविश्वाास वाटत आहे. विरोधकांनीही हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांच्या घरातील उमेदवारी देत आघाडीला भक्कम बनवले आहे. दोन्ही आघाड्याकडे काही चांगले उमेदवार असल्याने लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

एकाच आघाडीकडे पूर्णता सत्ता जाणार का; याबाबत साशंकता आहे. तरीही आपलीच आघाडी निवडून येणार या अंदाजाने आतापासूनच सत्तारूढ व विरोधक गटाचे समर्थक मोठ्या पैजा लावत आहेत.