सहकार क्षेत्रात दूध संकलनात राज्यात अग्रस्थानी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे वादाने गाजली. सभासदांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देताच पद्धतशीरपणे सभा बुधवारी  सत्तारूढ गटाने गुंडाळली. सभेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करून अवघ्या अर्धा तासातच सभा आटोपण्यात  आली.

त्यात गेल्या वर्षी अभूतपूर्व गोंधळात मंजूर करण्यात आलेला गोकुळ मल्टीस्टेटचा (बहुराज्य संस्था नोंदणी) वादग्रस्त ठराव, दोन दिवसांपूर्वीच रद्द करत असल्याचे पत्र काढून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चकविल्याचेही  सभेत समोर आले. शिवाय ‘आमचं ठरलंय, दक्षिण उरलंय पाठोपाठ आता गोकुळ राहिलंय’ या प्रभावी ठरणाऱ्या विरोधकांच्या बोधवाक्याची प्रचिती या निमित्ताने दिसून आली.

सुमारे बावीस कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघात माजी आमदार महादेव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार चंद्रदीप नरके असा राजकीय संघर्ष सुरू आहे. यापूर्वी महाडिक यांचे दुधाचे टँकर असल्याने,त्यावरून विरोधकांचा सत्तासंघर्ष सुरू होता. तर गेल्या वेळी मल्टीस्टेटच्या नावाखाली हा दूध संघ महाडिक घराण्याच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने, त्या विरोधातही सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात आला. गेल्यावर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळात विरोधकांचा विरोध मोडून काढून मल्टीस्टेटचा ठराव मंजूर करत, अवघ्या दोन मिनिटांत सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली होती. विरोधकांनी समांतर सभा घेऊ न जोरदार विरोध केला होता.

दोन दिवसांपूर्वीच गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी हा ठराव रद्द करत असल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे एकीकडे सत्ताधारी संचालकांकडून लोटांगण घातल्याचे आणि महाडिकांना धास्ती वाटू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. आजच्या सर्वसाधारण सभेने मात्र विरोधकांनाच गुंडाळल्याचे दिसून आले.गेल्या वेळी झालेल्या सभेत खुच्र्याची फेकाफेक, चप्पल फेक अशा राडय़ाच्या पाश्र्वभूमीवर आज झालेल्या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी खुच्र्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या.

सभेच्या सुरुवातीस अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्याकडून वर्षभरातील संघाच्या आढाव्याचे वाचन करण्यात आले. वादग्रस्त मल्टीस्टेट ठरावा संदर्भात बोलताना त्यांनी कर्नाटकसह महाराष्ट्र अशा दोन राज्यांमधून या ठरावास मान्यता मिळाली असून,केंद्रात नोंदणी कार्यालयात सध्या हा प्रस्ताव आहे. परंतु काही विरोधक आणि संस्थांचा या प्रस्तावाला असलेला विरोध पाहता, जोपर्यंत संघातील सर्व सभासद संस्थांचा विश्वास बसत नाही, तोपर्यंत ह्य प्रस्तावास थांबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या संदर्भात काही विरोधक न्यायालयात गेले आहेत.त्यामुळे हा ठराव रद्द करण्यासह यावर बोलता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांच्याकडून विषय पत्रिकेवरील विषय मंजुरीसाठी वाचन करण्यात येत असतानाही गोंधळ झाला. या वेळीसुद्धा आपटे यांनी मुठभरांचा विरोध वगळता, बहुतांश सर्व सभासदांच्या मंजुरीने सर्व विषय मंजूर झाले असल्याचे स्पष्ट करत, उपस्थित सभासदांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

सभेत सत्ताधारी गटातील माजी आमदार महादेव महाडिक, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख विरोधी गटातील आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार चंद्रदीप नरके हे अनुपस्थित राहिले.

अर्ध्या तासातच सभा गुंडाळली

एकाही सभासदाला प्रश्न विचारण्याची कसलीही संधी देण्यात आली नाही. संचालक रणजितसिंह पाटील यांच्याकडून आभार व्यक्त होताच, थेट राष्ट्रगीताची ध्वनिफीत लावून ही सभा जेमतेम अध्र्या तासातच गुंडाळण्यात आली. सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी न देण्यात आल्याने या वेळी गोंधळ निर्माण झाला होता.