‘गोकुळ’ने त्यांच्या गायीच्या दुधाच्या विक्री दरात २ रुपयांनी कपात केली आहे. ४४ रुपयांनी विक्री होणाऱ्या या दुधाची किंमत उद्यापासून ४२ रुपये होणार असल्याचे ‘गोकुळ’ व्यवस्थापनाकडून बुधवारी सांगण्यात आले.

‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. या वेळी दूध उत्पादनात सर्वत्र झालेल्या वाढीमुळे हा दर कपातीचा निर्णय घेण्यात आला. ‘गोकुळ’कडून त्यांच्या कार्यक्षेत्रातून गायीचे साडेचार लाख लिटर तर कार्यक्षेत्राबाहेरून ७० हजार लिटर दुधाची रोज खरेदी केली जात आहे. सध्या या पुरवठय़ात अजून वाढ झाल्यामुळे संघाने कार्यक्षेत्राबाहेरील दूध खरेदीच्या दरात तब्बल ४ रुपयांनी कपात केली आहे. तसेच खरेदी दरातील या कपातीचा फायदा विक्री करताना देण्यात आला आहे. ‘गोकुळ’कडून खरेदी केलेल्या दुधाची बहुतांश विक्री ही पुणे आणि मुंबई शहरात होते. यातही संकलित पाच लाख २० हजार लिटरपैकी एकटय़ा मुंबईत अडीच लाख लिटर दूध वितरित केले जाते. या विक्री दर कपातीचा उत्पादकांना फटका तर शहरी खरेदीदारांना फायदा होणार आहे.