कोल्हापूरमध्ये विस्ताराचे अमूलचे नियोजन; अन्य दूध संघांपुढे अस्तित्वाचे आव्हान

राज्यातील आघाडीचा दूध संघ ‘गोकुळ’च्या पुढय़ात लवकरच देशातील सर्वात मोठा दूध उत्पादक संघ ‘अमूल’चे कडवे आव्हान उभे राहणार आहे. एकीकडे संघातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण, भ्रष्टाचाराचे होत असलेले आरोप या तुलनेत आता येऊ घातलेल्या या नव्या व्यावसायिक संकटाचा हा संघ कसा सामना करेल याबद्दल कुतूहल आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

उसाच्या गोडव्याने कोल्हापूरला श्रीमंती आणली, पण गोकुळच्या दुधाने संपन्नता आणली. शेतकरी असो की शेतमजूर, प्रत्येक उंबरठा गोकुळच्या पैशातून सजला. गावगाडय़ाचे  चलन-वळण सुधारले तसतसे गोकुळच्या संचालक मंडळातील ऐश्वर्याच्या कथांना पाय फुटले. कालपर्यंत दुचाकीवरून रपेट मारणाऱ्या संचालकांच्या घरी अक्षरश: गोकुळ नांदू लागले. कारभाऱ्यांचे राजकारण अर्थसमृद्धीने वाहू लागले. त्यातून कोणालाही वाकवण्याची ताकद निर्माण झाली. १८०० कोटींची उलाढाल असलेल्या या संघातील लोणी मटकावण्याचा रंगीत-संगीत प्रकारची चर्चा इतकी वाढली की, विरोधकांना आयते कोलीत मिळाले.

राजकारणातील सामना गोकुळच्या दुधावर तापू लागला. राज्यात एकटय़ा गोकुळची मक्तेदारी राहिली तोवर कसलेच भय नव्हते; पण आता देशातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या ‘अमूल’ने थेट ‘गोकुळ’ला धडक मारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत स्थिरावलेल्या या ‘अमूल’ने कोल्हापूर परिसरात मोठी जमीन खरेदी करत आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. ‘अमूल’च्या या हालचालींमुळे साहजिकच ‘गोकुळ’च्या उरात धडकी भरू लागली आहे.

अमूलचा राज्यभर विस्तार

राजधानी मुंबई हे अमूलचे पहिले लक्ष्य राहिले होते. शिखर संस्था असलेल्या ‘महानंद’ला प्रथम या ‘अमूल’ने निकामी केले. जादा दराचे आमिष दाखवून सहकारी संघ व खासगी दूध ‘अमूल’ने स्वत:कडे वळवले. आज मुंबईत ‘महानंद’चे संकलन २ लाख लिटपर्यंत खाली आले आहे, तर ‘अमूल’चे  १३ लाखांवर पोहोचले आहे. अमूल आता संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायला निघाले आहे. या अंतर्गत या संघाने राज्यात सुमारे १५ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. सुमारे ३२ हजार कोटींचा ब्रँड आणि जगात १६ वा क्रमांक असलेल्या बलाढय़ ‘अमूल’शी सामना करणे हे जिथे ‘गोकुळ’ला आव्हानात्मक वाटते आहे, तिथे अन्य दूध संघांची तर स्पर्धाही होणे अवघड आहे.

स्पर्धात्मक होण्याची गरज

‘अमूल’च्या या हालचालींना तोंड देण्यासाठी ‘गोकुळ’नेही पावले टाकायला सुरुवात केली आहे; परंतु यात अद्याप दिशा आणि गती दिसत नाही. त्यातच हा राज्यातील बलाढय़ दूध संघ सध्या अंतर्गत राजकीय कुरघोडय़ांनी त्रस्त आहे. ‘अमूल’च्या या शिरकावाला तोंड देण्यासाठी स्पर्धात्मक होण्याची गरज ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाला वाटू लागली आहे. मात्र एखाद-दुसरा संचालक वगळता या स्पध्रेची जाणीव संचालकांना नसल्याने ‘अमूल’च्या आव्हानासमोर गोकुळचा मार्ग खडतर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मात्र गोकुळ सर्व प्रकारच्या स्पध्रेला सामोरा जाण्यास सक्षम असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक ती पावले टाकली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कार्यपद्धतीत बदल हवा

  • ‘अमूल’च्या स्पध्रेत टिकायचे असेल, तर राज्यातील सहकारी दूध क्षेत्राने आपली कार्यपद्धती आणि दृष्टी बदलण्याची गरज आहे, असे मत गोकुळचे संचालक अरुण नरके यांनी व्यक्त केले.
  • प्रचंड व्याप असलेल्या ‘अमूल’चा व्यवस्थापन खर्च दीड टक्के आहे, तर गोकुळसारख्या संघाचा खर्च आहे तब्बल साडेचार टक्के.
  • प्रशासकीय कारभार व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बठकीशिवाय इतर वेळी ‘अमूल’चे संचालक संघाकडे फिरकतही नाहीत.
  • तिथे व्यावसायिक आणि कार्यक्षम पद्धतीनेच कामकाज चालवले जाते. या साऱ्यातून ‘गोकुळ’ने मोठा धडा घेण्याची गरज नरके यांनी व्यक्त केली.

अंतर्गत राजकारण

  1. ‘गोकुळ’चे सर्वेसर्वा माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी गृह राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय सामन्याला ‘गोकुळ’च्या मदानातही उकळी फुटली आहे.
  2. या राजकीय कुरघोडीत राज्यातील सर्वात मोठा असलेला गोकुळचे दूध नासण्याचा धोका उद्भवला आहे. गेल्या वार्षकि सर्वसाधारण सभेत सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या भ्रष्ट कारभाराची पिसे काढली.
  3. एकीकडे ‘अमूल’चे कडवे आव्हान पुढय़ात उभे राहिले असताना त्यासाठी आवश्यक ती पावले टाकण्याऐवजी ‘गोकुळ’ची सारी शक्ती ही या अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यातच खर्ची होत आहे.
  4. यात वेळीच काही सुधारणा न झाल्यास महाराष्ट्रातील या मोठय़ा दूध संघाचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.