|| दयानंद लिपारे

कोल्हापूर : सत्तारूढ आणि विरोधी गटाच्या ६५ टक्के ठराव आपल्या बाजूने असल्याच्या दाव्यातील सत्यता, दोन्ही गटांतून ठराव दाखल करताना झालेला सवतासुभा, त्यातून निर्माण झालेले मतभेद, बंडखोरांची सत्तेत वाटा मिळवण्याची चाल, निवडणूक बिनविरोध करण्याच्या गप्पा आणि त्यातून रंगलेले राजकारण अशा घडामोडींमुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील सत्तासंघर्ष टिपेला पोचला आहे.

राज्यातील सर्वात मोठय़ा सहकारी दूध संघावर सत्ता स्थापन करण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधकांनी कंबर कसली असून प्रतिस्पध्र्याना शह देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बडय़ा राजकीय नेत्यांनी गोकुळचे नवनीत आपणच मिळविणार असा निर्धार केल्याने मतांचे ठराव मिळवण्यासाठी ‘लाख-मोला’ची बोलणी सुरू झाल्याने निवडणुकीत अर्थकारण महत्त्वाचे ठरले आहे. राज्यातील सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर महाविकास सहकारी विरुद्ध भाजप महाडिक गट, काँग्रेसमधील पी. एन. पाटील गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलण्यात गोकुळ दूध संघाचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा ‘गोकुळ’मुळे सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनातही मोठा बदल घडला. त्याहून अधिक मोठा बदल घडला तो संचालकांच्या आयुष्यात. सामान्य कार्यकर्ता गोकुळचा संचालक झाला की त्याच्या घरी अल्पकाळात ऐश्वर्य नांदू लागते. याची  जितीजागती उदाहरणे असंख्य असल्याने गोकुळचा संचालक होण्यासाठी एकच आटापिटा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर, सुमारे २५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला गोकुळ दूध संघ आपल्या ताब्यात असावा हे जिल्ह्य़ातील तमाम नेत्यांचे स्वप्न असून त्यासाठी ते काहीही करण्याच्या मन:स्थितीत आहेत. आताची निवडणूक याच सत्ताकांशी ईर्षेचा दाखला देत आहे.

ठरावाच्या सत्यतेवर शंका

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी गावोगावच्या दूध संघांकडून प्रतिनिधी नावाने ठराव मागितले जातात. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांच्या सत्तारूढ गटाने २,२४० संस्थेचे ठराव दाखल केल्याची यादी सादर केली. तर, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या गोकुळ विरोधी कृती समितीने २२०० ठराव दाखल केल्याचा दावा केला आहे. याशिवाय, सत्तारूढ गटाकडून गटातील माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, पाटील यांनी स्वतंत्रपणे ५०० संस्थांचे ठराव दाखल केल्याने सत्तारूढ गटाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. याच वेळी विरोधी गटाकडून आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी स्वतंत्र ठराव दाखल केले आहेत. एकंदरीत ३,६५९ संस्थेंचे ठराव मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, आतापर्यंत सत्ताधारी, विरोधक आणि स्वतंत्रपणे दाखल करण्यात आलेल्या ठरावांची संख्या ही जवळपास दुप्पट म्हणजे ६ हजारांच्या घरात जात असल्याने नेमका कोणाचा आकडा बरोबर याच्या सत्यासत्यतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

बलाढय़ गटाची निवडणूक

गोकुळ दूध संघ हा महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाचा मुख्य स्रोत आहे. त्यासाठी ते काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांना निकटचे सहकारी मानतात. विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुकीत महाडिक घराण्यातील दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने महाडिक यांच्याविषयी नकारात्मक वातावरण दिसत आहे. याची जाणीव झाल्याने महादेवराव महाडिक यांनी चाणाक्षपणे पी. एन. पाटील यांना पुढे केले आहे. पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याचे मनोदय व्यक्त केला आहे. मुश्रीफ यांनी अशी चर्चा करण्यास आवडेल असे स्पष्ट करतानाच गेल्या निवडणुकीत सहकार्य करूनही गोकुळच्या नेत्यांनी म्हणजे महादेवराव महाडिक यांनी सतत अपमानित केले आहे अशी जाहीरपणे खंत व्यक्त केली आहे. मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यावर निशाणा साधला असल्याने गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न पूर्ण होणार का, यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

संचालक मंडळासाठी खटाटोप

नेत्यांचे ‘गोकुळ’वर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरी फळी संचालक मंडळात कसा प्रवेश करता येईल याच्या या खटाटोपात मग्न आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल केले आहेत. त्यांची नाराजी दूर कशी करायची, त्यांना संचालक मंडळात प्रवेश कसा द्यायचा याची डोकेदुखी सत्तारूढ आणि विरोधी गटासमोर निर्माण झाली आहे. गोकुळच्या निवडणुकीत सातत्याने चित्र बदलत चालले असल्याने एप्रिलमध्ये प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत शह – काटशहाचे राजकारण कसे वळण घेत राहणार यावर निकालाचा कल अवलंबून असणार आहे.

बडे नेते सक्रिय

  • काहीही करून गोकुळ दूध संघ ताब्यात ठेवणे हे महाडिक यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतात. त्यातून त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे नेतृत्व सोपवले आहे.
  •  कोल्हापूर जिल्ह्य़ात काँग्रेसचे मंत्रिपद मिळवण्यासाठी सतेज पाटील व पी. एन. पाटील यांच्यात स्पर्धा रंगली होती. सतेज पाटील यांनी बाजी मारल्याने पी. एन. यांची नाराजी दिसून आली.
  • मंत्रिपदाचा हा वाद गोकुळमध्ये रंगणार आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप उतरणार आहे, असे म्हणत भाजपची ताकद महाडिक यांच्या पाठीशी उभी केली आहे.
  •  सतेज पाटील, हसन मुश्रीफ व राजेंद्र पाटील-यड्रावकर हे तिन्ही मंत्री आणि खासदार संजय मंडलिक हे बडे नेते एकत्र आल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे.
  • जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, वारणा दूध संघाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ठराव सादर करताना त्यांचे समर्थक करणसिंग गायकवाड विरोधी गटासमवेत राहिल्याचे दिसून आल्याने कोरे विरोधकांना मदत करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.