31 May 2020

News Flash

‘गोकुळ दूध महासंघ’च कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कवित्व कोल्हापूर जिल्ह्य़ात सुरू झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

|| दयानंद लिपारे

वर्षभर आधीच निवडणुकीचे वारे : – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कवित्व कोल्हापूर जिल्ह्य़ात सुरू झाले आहे. याच वेळी आता राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा दूध संघ असलेला आणि २२०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला ‘गोकुळ’ दूध संघ हाच जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. ‘गोकुळ’च्या (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांना गुंगारा देत बहुराज्य ठरावाला मान्यता असल्याच्या इतिवृत्ताला मंजुरी घेऊन गोकुळ बहुराज्याच्या दिशेने जाणार असल्याचे अधोरेखित करीत विरोधकांना ‘दे धक्का’ दिला आहे.

सत्तारूढ गटाने बाजी मारली असली तरी वर्षभरात होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बहुराज्य विषयावरून गोकुळच्या दुधाला राजकीय उकळी येणार हे जाणवू लागले आहे. विरोधकांकडे आता एक खासदार, तीन आमदार असे बलाढय़ राजकीय बळ असल्याने त्यांच्याशी घरात कोणतेही लोकप्रतिनिधीचे पद नसलेल्या महाडिकांना मुकाबला करणे कठीण होणार असल्याचे जाणवत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीतून उसंत मिळाली असताना आता सत्तारूढ आणि विरोधकांना गोकुळच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. गोकुळचे लोणी मटकावयाचे कोणी यासाठी खल सुरू झाला आहे.

‘गोकुळ’च्या कुप्रसिद्धीत वाढ

महाडिक यांच्या एकहाती सत्तेला चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विधानसभेत पराभवाचा झटका बसलेले सतेज पाटील यांनी आव्हान दिले. अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र गोकुळमधील महाडिक यांच्या कारभारावर आणि गोकुळमधील गैरव्यवहारावर त्यांनी नेहमीच तोंडसुख घेण्याचे सत्र सुरू ठेवले. गोकुळ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांनी सत्ताधाऱ्यांना नेहमीच निशाण्यावर ठेवले. त्यातून गोकुळची कुप्रसिद्धी वाढत गेली. गोकुळचे चांगले पैलू अंधारात राहिले. २२०० कोटींची उलाढाल असलेल्या संघाचा कारभार हाकणारा अध्यक्ष यथातथाच क्षमतेचा राहिला. विरोधकांचा मारा परतवण्यात ते कायम कमी पडले. यात महाडिकांच्या वाटय़ाला बदनामी येत राहिली. गोकुळ बहुराज्य झाल्यावर कोणते फायदे होणार हे पटवून देण्यात संचालक अपयशी ठरले. तर, हा ठराव झाल्यावर जिल्ह्य़ातील सामान्य दूध उत्पादक शेतकरी आणि गावोगावच्या दूध संस्थांवर गदा येणार असल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला. त्यातून गोकुळची प्रतिमा आणखी मलिन झाली. कालच्या सभेत गोकुळ संघाला बहुराज्य दर्जा (मल्टीस्टेट) मिळवण्याचा विषय पुन्हा गाजला. बहुराज्यावर ठाम असल्याचे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हाच विषय गोकुळच्या आगामी निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे आतापासून दिसत आहे.

गोकुळचे राजकीय रण तापले

गोकुळ एकदा का बहुराज्य दर्जाचे झाले की जिल्ह्य़ातील दूध संघाची किंमत आणि स्थान कायमचे संपले हा विरोधकांचा मुद्दा अधिक प्रभावी ठरला. महाडिक यांच्या विरोधात याच मुद्दय़ावरून रान पेटवले. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक तर विधानसभेत अमला महाडिक यांचा दारुण पराभव झाला. दोघांच्या पराभवाला गोकुळचे बहुराज्य प्रकरण नेमके किती कारणीभूत यावर मतभेद आहेत, पण पराभवाचे एक मुख्य कारण हेच असल्याचा समज लोकांमध्ये रुजला आहे. त्यातूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात शेतकऱ्यांनी पी. एन. पाटील यांना भेटून बहुराज्याचा ठराव मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. खुद्द संचालक मंडळात मतभेद आहेत. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी याला विरोध केला असून अन्य काही संचालक याच मताचे आहेत. खेरीज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनीही वेळोवेळी गोकुळच्या बहुराज्य विरोधात मत नोंदवले आहे. गोकुळच्या बहुराज्य ठरावाला सभासदांची मंजुरी असल्याची इतिवृत्तात नोंद करून सत्तारूढ गटाने विरोधकांवर गनिमी काव्याने मात केली असली तरी निवडणुकीच्या रणांगणात मात्र हा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येऊ शकतो. हा प्रकार दूध उत्पादकांना आपली फसवणूक झाली हे सांगण्यास पुरेसा ठरणार आहे. त्यावरून वारे फिरू शकते. आधीच सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय आता गोकुळ उरलंय’ असे घोषवाक्य घेऊन गोकुळ सर करण्याची तयारी चालवली आहे. गेल्या वेळी ते एकाकी लढले. गतवेळी सत्ताधारी तंबूत असलेले राष्ट्रवादीचे वजनदार नेते आमदार हसन मुश्रीफ आता विरोधकांना मिळाले आहेत. संजय मंडलिक यांच्या अंगावर खासदारकीची तर ऋतुराज पाटील यांच्या अंगावर आमदारकीची वस्त्रे चढली असल्याने विरोधकांना स्फुरण चढणे स्वाभाविक आहे. महाडिक प्रथमच लोकप्रतिनिधीचे एकही पद नसताना लढणार असून त्यांची मदार पी. एन. पाटील यांच्यावर असेल.

विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाहता पाटील किती आR मक राहणार यावर सत्तारूढ गटाचे यश अवलंबून राहील. महाडिक यांच्यावर टीकास्त्र डागले जात असताना स्वत:ला सुरक्षित करून तुंबडय़ा भरणाऱ्या बऱ्याच संचालकांना उमेदवारी तरी मिळणार का, हाही प्रश्न आहेच. त्यामुळे आगामी काळात गोकुळची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात धगधगत राहणार, याचे संकेत गोकुळच्या कालच्या गोंधळात पार पडलेल्या सभेने दिले आहेत.

‘गोकुळ’मुळे संचालक गब्बर 

गोकुळ दूध संघामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात ‘गोकुळ’ नांदू लागले. याच वेळी गोकुळचा संचालक झाल्यावर कालचा फाटका माणूस अल्पकाळात भलताच नेटका होऊ लागला. गोकुळची ही अर्थपूर्ण गोडी इतकी अवीट की आमदार – खासदार नको, पण गोकुळचा संचालक बनवा, असा जिल्ह्य़ातील नेत्यापासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत लकडा लावला जातो. आजवर गोकुळ त्याच्या गुणात्मक कार्याने जितका प्रसिद्ध पावायला हवा होता तितका तो झाला नाही, कोणी संचालकही त्यासाठी हातपाय हलवताना दिसत नाही. उलट गोकुळमधील मलईदार कारभार ज्याच्या-त्याच्या मुखी असतो. अशा या गोकुळवर ‘मनपा’ची सत्ता गेली अनेक वर्षे कायम राहिली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची ही ‘मनपा’ जिल्ह्य़ात राजकीय वजनदार म्हणूनही ओळखली जाते. महाडिक ते त्यातील मुख्य कारभारी, जोडीला पाटील आणि नरके.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 2:17 am

Web Title: gokul milk gokul dudh mahasangh politics akp 94
Next Stories
1 कोल्हापूरकरांना काय हवे, हेच चंद्रकांत पाटील विसरले – हसन मुश्रीफ
2 प्रकाश आवाडे यांचा भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा
3 चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच कोल्हापुरात युतीला फटका
Just Now!
X