18 November 2017

News Flash

‘गोकुळ’कडून दरवाढीचे संकेत

खरेदी दरात ३ रुपये वाढ केल्याने निर्णय

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: July 2, 2017 1:30 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

खरेदी दरात ३ रुपये वाढ केल्याने निर्णय

राज्यातील सर्वात मोठय़ा  ‘गोकुळ’ दूध संघाने दूध दरवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले असून पाठोपाठ अन्य खासगी व सहकारी दूध संघही दरवाढीचा हाच मार्ग अनुसरणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासनाने दूध खरेदी दरात  प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, पण या दरवाढीचा बोजा दूध संघानी आपल्या खांद्यावर न घेता तो ग्राहकांच्या डोक्यावर लादण्याची खेळी केली असल्याने ग्राहकांना वर्षांकाठी  सातशे  कोटी रुपये  ज्यादाचे मोजावे लागणार आहेत .

राज्यातील शेतकरी संपाची तीव्रता वाढू लागल्याने त्याची धास्ती घेत राज्य सरकारने  दूध दरात  तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय जूनच्या मध्यास घेतला. ही दरवाढ करण्यापूर्वी शासनाने दूध संस्थांची बठक घेतली असता एकतर्फी दरवाढ लादू  नये, अडचणीत असलेल्या संस्थांना ती परवडणारी नाही, असा सूर संस्थाचालकांनी लावला होता. मात्र शासनाने शेतकरी हित  लक्षात घेत दूध दरवाढ करण्यास भाग पाडले आणि कुरकुरत का होईना दूध संघानी त्याला मान्यता दिली. तथापि, दूध दरवाढीचा बोजा सहन करणे दूध संस्थांच्या आíथक आवाक्याबाहेरचे होते. त्याची प्रचिती शनिवारी आली.

गोकुळकरणार दरवाढीची सुरुवात

शेतकऱ्यांच्या पदरात दरवाढीचे माप  टाकून शासन निर्णयाचे उत्साहाने सर्वप्रथम स्वागत आणि कार्यवाही केली ती ‘गोकुळ’ ने. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने शासनाच्या दूध दरापेक्षा २ रुपये दर  अधिकच देण्याचे धोरण अगोदरपासूनच घेतले होते. शासनाने शेतकऱ्यांना दरवाढ केल्यावर गोकुळने इतर संस्था शासन निर्णय यापेक्षा अधिक दर  देण्याचा निर्णय तेव्हा लगेचच जाहीर केला. त्यावेळी  इंडियन डेअरी असोसिएशन या संस्थेचे  अध्यक्ष,  गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण नरके व कार्यकारी संचालक डी . व्ही .   घाणेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दूध दरवाढ करताना शासनाने  कसलाही आधार घेतला  नाही, यामुळे संचालक मंडळात आगामी काळात दूधदरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले होते, तर या भूमिकेवर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी  शिक्कामोर्तब करताना महिनाभरात दूध दरात  वाढ करणार असल्याचे स्पष्ट केले. वर्षांकाठी ४० कोटी रुपयांचा बोजा गोकुळला परवडणारा नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य दूध खासगी व सहकारी संघ याच मार्गाने जाणार असल्याचेही ते म्हणाले.

ग्राहकांना सातशे कोटींचा फटका

राज्यात दररोज सहकार क्षेत्रात ४० लाख तर खासगी क्षेत्रात ६० लाख लिटर दूध संकलन होते. त्यातील सुमारे ७० लाख लिटर दूध पिशवीतून विकले जाते तर उर्वरित दूध हे पावडर , लोणी आदींसाठी वापरले जाते. आता दूध संघांनी प्रतिलिटर २ ते ३ रुपये दरवाढ करण्याची तयारी चालवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणजे ग्राहकांना रोज सुमारे २ कोटी प्रमाणे वर्षांला सातशे कोटीहून अधिक रक्कम ज्यादा खर्चाची लागणार आहे. शासनाने दरवाढ जाहीर केल्यानंतर ‘लोकसत्ता’ने दिलेल्या वृत्तात याचा फटका ग्राहकांना बसणार असल्याचे नमूद केले होते, आता ग्राहकांना त्याची प्रत्यक्ष ‘किंमत’ मोजावी लागणार आहे.

 

First Published on July 2, 2017 1:30 am

Web Title: gokul milk gst marathi articles