५ लाख शेतकऱ्यांना संक्रांतीची गोड भेट

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने ५ लाख दूध उत्पादकांना संक्रांतीची गोड भेट मंगळवारी दिली. गाय दूध खरेदी दरात दोन रुपये तर म्हशीच्या दुधासाठी १ रुपये ७० पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दररोज २४ लाख रुपये अधिक मिळतील, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले.

गोकुळने (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये १ फेब्रुवारीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  गाय दूध दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये वाढ करण्यात आली आहे.  त्यामुळे गाय दूध दर २७ रुपयांवरून २९ रुपये होणार आहे. म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये ७० पैसे  वाढ करण्यात आली असून म्हैस दूध खरेदी दर ४२ रुपये ३० पैशांवरून ४४ रुपये होणार आहे.

लवकरच विक्री दरात वाढ – आपटे

‘गोकुळ’ला गायीच्या दुधाचा पुरवठा दररोज साडेपाच लाख लिटर तर म्हशीच्या दुधाचा पुरवठा ७ लाख लिटर होतो. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने ५ लाख उत्पादकांना दररोज २४ लाख रुपये अधिक मिळतील, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले. दरम्यान, अमूलसह खासगी दूध संघांनी दूध विक्रीमध्ये दरवाढ केली आहे. ‘गोकुळ’ही याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे, असे आपटे म्हणाले. गोकुळने मागील महिन्यात पुणे भागातील दूध विक्री दरात वाढ केली होती.