सतेज पाटील यांचा इशारा

अन्य दूध संघ दुधाची खरेदी प्रति लिटर २९ रुपये दराने करीत असताना गोकुळ मात्र २५ रुपये दराने खरेदी करीत आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असून या विरोधात आवाज उठवणार आहे. येत्या आठवडय़ात ‘गोकुळ’च्या अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा करून दूध दरवाढ करण्यास भाग पाडू, असे मत आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीतून उसंत घेतल्यानंतर आता पाटील यांनी तीन महिन्यानंतर येणाऱ्या गोकु ळच्या निवडणुकीचे वातावरण आतापासूनच तापवण्यास सुरुवात केल्याचे या विधानातून दिसून आले.

येथील तपोवन मैदानावर ‘सतेज कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन आमदार सतेज पाटील, प्रतिमा सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, महापौर सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते झाले. दरवर्षी या प्रदर्शनात राजकीय कोटय़ा — टोलेबाजी यामुळे रंगत येत असे. यावेळी जिल्ह्य़ातील आमदार — खासदार राजकीय घडामोडीत गुंतले असल्याने आज केवळ फित कापून उद्घाटन झाले. भाषणबाजी टाळण्यात आली. मात्र, आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला.

राज्यात सर्वात मोठा असणारा गोकुळ दूध संघ इतर संघापेक्षा कमी दर देत असल्याच्या मुद्दय़ावर पाटील यांनी पुन्हा एकदा गोकुळच्या संचालक मंडळावर तोफ डागली. ते म्हणाले, गोकुळचा बहुराज्य दर्जा मिळवण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आमच्या आंदोलनामुळे मागे घ्यावा लागला. हा आमचा विजय आहे. दूध कमी देणे चुकीचे आहे. त्याला सत्तेत परिवर्तन हेच उत्तर आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याने अध्यक्षांना भेटून विचारणा करू. इतर संघाप्रमाणे दर  देण्यास भाग पाडू.

जिल्ह्यत महाविकास आघाडी निवडणुकीत हातकणंगले, चंदगड या दोन्ही नगरपंचायती तसेच शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद पोट निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. हातकणंगलेमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काँग्रेसचा असावा असा प्रयत्न आहे. तेथे शिवसेनेचा एक गट सोबत येणार आहे. काँग्रेसचे आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी, स्वाभिमानी यांच्यात ऐक्य आहे. शिरोळचे शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी सोबत करण्यास संमती दिली आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी जुळवाजुळव सुरु  केली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे  बाजूला जाणार असल्याचे माझ्या कानावर नाही.