25 November 2017

News Flash

‘गोकुळ’ने ग्राहकांवर दरवाढ लादल्यास तक्रार- सतेज पाटील

‘गोकुळ’ केवळ गायीच्या दूधदरात वाढ करतानाच विक्रीदरात वाढ करणार असल्याचे म्हटले आहे.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: July 4, 2017 3:11 AM

सतेज पाटील

‘गोकुळ’ केवळ गायीच्या दूधदरात वाढ करतानाच विक्रीदरात वाढ करणार असल्याचे म्हटले आहे. या बाबत राज्याच्या दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनीही ग्राहकांवर असा बोजा लादता येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर गोकुळ ग्राहकांवर बोजा टाकणार असेल, तर या बाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासनाने कर्जमाफी करतानाच दूध उत्पादकाला दिलासा मिळावा म्हणून दूध खरेदी दरात प्रतिलीटर तीन रुपयांची वाढ देण्याचे आदेश दूध संघांना दिले आहेत. ही दूध दरवाढ गाय व म्हशीच्या दुधाला जाहीर करण्यात आली आहे, असे नमूद करून पाटील म्हणाले, मात्र ‘गोकुळ’ने केवळ गायीच्या दूधदरात वाढ केली असून ग्राहकांवर त्याचा बोजा लादता येणार नसल्याने शासन यंत्रणेकडे तक्रार केली जाणार आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य उमेश आपटे, सदस्य भगवान पाटील व ‘गोकुळ’ माजी संचालक बाबासाहेब चौगुले उपस्थित होते.

ग्राहकांवर दरवाढीचा बोजा न टाकता शेतकऱ्यांना जादा दर देणे शक्य आहे. त्यासाठी संचालक व कारभाऱ्यांनी खाबूगिरीला आळा घालावा, असे सांगून पाटील म्हणाले, संस्थेने व्यवस्थापन खर्च कमी केल्यास, अनावश्यक संचालकांची वाहने फिरवणे बंद करावे. व्यक्तिपूजा करणाऱ्या जाहिरातबाजीवरील लाखोंची उधळण टाळली पाहिजे. ‘गोकुळ’कडून दूध टँकरची निविदा काढली असता ५० लाखांची अनामत ठेवण्याची अट घालून अन्य पुरवठादार या साखळीत येऊ नये, अशीच भूमिका घेतली आहे. संघाच्याच संचालकांच्या टँकर वाहतुकीच्या संस्था दाखवून ही निविदा मॅनेज करण्यात आली आहे. संघाकडून दूध वाहतुकीसाठी प्रतिलीटर १ रुपये ६९ पसे दिले जातात. वारणा संघापेक्षा हा दर ६३ पशांनी जास्त आहे. तसेच वितरकांनाही लीटरला ४ रुपये ५५ पसे कमिशन देऊन यातूनही मलिदा घेतला जातो. असे अनेक अनावश्यक खर्च जर कमी केले गेले, तर ग्राहकांवर बोजा न टाकता दूध उत्पादकाला लीटरला ३ रुपये अधिक देणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on July 4, 2017 3:11 am

Web Title: gokul milk prices hike issue satej patil