30 October 2020

News Flash

दूभत्या पाळीव जनावरांवरही आता आयुर्वेदिक उपचार

आयुर्वेदिक उपचारांना येत असलेले महत्त्व आता पाळीव जनावरांच्या उपचार पद्धतीतही येऊ घातले आहे.

‘गोकुळ’कडून पुढाकार;  बेंगळुरुच्या संस्थेचे सहकार्य

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : बदलत्या जीवनशैलीत आयुर्वेदिक उपचारांना येत असलेले महत्त्व आता पाळीव जनावरांच्या उपचार पद्धतीतही येऊ घातले आहे. दुग्ध व्यवसायातील देशातील मोठे नाव असलेल्या ‘गोकुळ’ने याबाबत पुढाकार घेतला असून त्यांनी आपल्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्वयंसेविकांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करत या कार्यक्रमास सुरुवात केली आहे.

‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि देशातील एक आघाडीचा दूध उत्पादक संघ आहे. या संघातर्फे दूध संकलनाशिवाय दुभत्या पाळीव जनावरांसाठीही विविध उपक्रम राबवले जातात. यातूनच जनावरांवरील उपचारांबाबतही सतत कार्यक्रम राबवले जातात. या अंतर्गत आता आयुर्वेदिक उपचारांसाठी संघाने पुढाकार घेतला आहे.

पशुवैद्यकीय सेवेतील या नव्या पद्धतीसाठी ‘गोकुळ’ने बेंगळूरु येथील ‘दि युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अ‍ॅण्ड  टेक्नॉलॉजी’ या आयुर्वेदिक विद्यापीठांसोबत नुकताच करार केला आहे. हे विद्यापीठ मनुष्य आणि जनावरे यांच्यावरील आयुर्वेदिक उपचारांबाबत काम आणि संशोधन करते. या अंतर्गत गोकुळ दूध संघाच्या ३२ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना नुकतेच बेंगळूरु येथे प्रशिक्षण दिले आहे. तसेच या उपचार पद्धतीच्या प्रसारासाठी गोकुळच्या महिला स्वयंसेविकांनाही प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे.

या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार तर महिला स्वयंसेविकांमार्फत गावपातळीवरच आयुर्वेदिक औषध तयार करण्याचे काम आणि या उपक्रमाच्या प्रसाराचे काम केले जाणार आहे.

कोणत्या आजारांवर उपचार?

लाळ खुरकत, स्तन ग्रंथीमधील सूज, आंतडय़ाचा दाह, स्तनशोय, स्तनावरील पुरळ, गर्भाशय संक्रमण, आम्लपित्त, पोटातील वात, ताप, हगवण, शरीरावरील जखमा अशाप्रकारे १८ प्रकारच्या आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत.

सहज उपलब्ध गोष्टींचा वापर

या उपचारांसाठी शेतकऱ्यांच्या अवतीभवती सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचाच वापर केला जाणार आहे. यामध्ये कोरफड, तुळस, शेवगा, कडुलिंब, कडीपत्ता, मेहंदी, वड, पिंपळ, उंबर इत्यादी प्रकारच्या वनस्पती आणि स्वयंपाक घरात उपलब्ध असणारे गूळ, हळद, काळी मिरी, लसूण, कांदा, नारळ, चिंच, जिरे, धणे, हिंग, मेथी, वेलदोडा, दालचिनी, खडीसाखर अशा वस्तूंचा वापर करून हे उपचार केले जाणार आहेत.

गरज का? ‘गोकुळ’कडे दूधपुरवठा करणारी गाय, म्हैस अशी सुमारे ५ लाख जनावरे आहेत. जनावरांनी घेतलेल्या आहार आणि औषधांचा परिणाम त्याच्या दुधावर होत असतो. जनावर आजारी पडल्यानंतर त्याला दिलेली प्रतिजैविके (अँटीबायोटिक) आणि इंग्रजी औषधांचे घटक दुधात उतरत असतात. त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होत असतात. प्राण्यांसाठी वापरली जाणारी प्रतिजैविके मानवी शरीरासाठी मारक ठरतात. हे सर्व टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती स्वीकारण्याचे ठरवल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 4:18 am

Web Title: gokul taken initiative for ayurvedic treatment on pet animals zws 70
Next Stories
1 भाजपच्या चुका महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील – शरद पवार
2  ‘कोल्हापूर प्राधिकरणा’चे चाक खोलातच
3 ‘जेसीबी’ लावून शिवपुतळा हटवणे संतापजनक – संभाजीराजे
Just Now!
X