‘गोकुळ’ने आपले दूध आता ‘टेट्रापॅक’मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. संघाचे हे नवीन उत्पादन ग्राहकांच्या सेवेत नुकतेच दाखल झाले आहे.

पुणे, मुंबईसारख्या मोठय़ा शहरात धावपळीच्या जीवनशैलीमुळे रोज दूध आणणे शक्य होत नाही. मग अशावेळी दूध मोठय़ा प्रमाणात साठवण्याकडे नागरिकांचा कल असतो. परंतु नेहमीच्या पिशवीत हे दूध खराब होण्याचा धोका राहतो. या समस्येचा विचार करत ‘गोकुळ’ तर्फे (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) या ‘टेट्रापॅक’मधून दूध विक्री करण्याचे ठरवले. यासाठी आवश्यक ते बदल करत नुकतीच संघाचे हे नवीन उत्पादन ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे.

‘गोकुळ’तर्फे ‘सिलेक्ट’ या नावाने ‘टेट्रापॅक’मधून हे दूध उपलब्ध करून दिले आहे. महानंद दुग्धशाळा मुंबई येथे दुधावर प्रक्रियेसाठी करार केला आहे. सुरुवातीस मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड व कोल्हापूर येथे तर लवकरच पुणे व इतर जिल्ह्यंमध्ये अशी ‘टेट्रापॅक’ दुधाची विक्री केली जाणार आहे. प्रारंभी रोज ‘टेट्रापॅक’ पद्धतीने २५ हजार लिटर दूध वितरित केले जाणार आहे. हे दूध एका स्वयंचलित अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे भरले आणि पॅक केले जात आहे. यामुळे मानवी हातांच्या स्पर्शापासून ते दूर राहते आहे. ते उच्चतम तापमानाला तापवले जात असल्याने त्यातील विषाणू नष्ट होतात. असे हे ‘टेट्रापॅक’ दूध सहा महिने टिकू शकते तर पिशवी उघडल्यानंतर शीतकपाटात ठेवत त्याचा दोन दिवस वापर करता येतो, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले. ‘गोकुळ’च्या या नव्या पॅकिंगमधील दूध विक्रीचा प्रारंभ संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते नुकताच झाला. सध्या ‘गोकुळ’तर्फे राज्य-परराज्यात रोज १२ लाख लिटर दुधाची विक्री होत आहे.