गोकुळ दूध संघाला बहुराज्य दर्जा देण्याच्या ठरावावरून कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वादाने उचल घेतली असताना उद्या रविवारी कोणाच्या सभेत याचे कसे पडसाद उमटणार याकडे पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकाचे लक्ष वेधले गेले आहे.

गोकुळच्या करवीर तालुका संपर्क सभेत आणि काल झालेल्या राजाराम साखर कारखान्याच्या सभेत मारहाण आणि जोरदार वाद झाला होता. ही पार्श्वभूमी पाहता सभा शांततेत पार पडणार, ती मागील वर्षी प्रमाणे गुंडाळली जाणार की सभेत सत्तारूढ-विरोधक यांच्यात आखाडा रंगणार या विषयी तर्क लढवले जात आहेत. या वादळी पार्श्वभूमीवर गोकुळच्या ताराराणी पार्कमधील सभास्थानी आतापासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गोकुळ हा राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ. १२ लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आत २० लाख लिटर प्रक्रिया करण्याइतपत विस्तारित केला जात आहे. त्यासाठी दुधाची गरज असल्याने संस्थेच्या कार्याचा पैसा वाढवला जात असून बहुराज्य दर्जा मिळवण्याचा प्रयत्न आहे. रविवारी होणाऱ्या सभेत हाच विषय कळीचा मुद्दा बनणार आहे.