माघारीवर विरोधकांची टीका

गेली दोन वर्षे जोरदार घुसळण होत असलेल्या राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाची बहुराज्य (मल्टिस्टेट) संस्था नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय  बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष  रवींद्र आपटे यांच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.

सभासदांच्या भावनांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे आपटे यांनी सांगितले. तर, गोकुळ विरोधी कृती समितीचे बाबासाहेब देवकर यांनीही विरोधकांच्या एकजुटीमुळे गोकुळवर ‘यू टर्न’ घेण्याची वेळ असल्याचे सांगत हा विरोधकांच्या ताकदीचा विजय असल्याचे सांगितले.

संचालक मंडळात उलटी गंगा

सुमारे २२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) हा राज्यातील सर्वात प्रभावी दूध संघ आहे. गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यच्या सीमा ओलांडून परराज्यात दुग्ध व्यवसाय करावा, या व्यापक हेतूने संचालक मंडळाने संघाला बहुराज्य (मल्टिस्टेट) दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. दोन वर्षांपासून गोकुळ मल्टिस्टेटचा मुद्दा गाजत आहे. या प्रकरणाने जिल्ह्य़ाच्या राजकारणाला उकळी फुटली. मल्टिस्टेटवरुन विरोधकांनी सत्ताधारम्यांना कोंडीत पकडले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गोकुळचे सर्वेसर्वा महाडिक यांना फटका बसला. त्यामुळे सत्ताधारी गटातही मल्टिस्टेट बाबत संचालक मंडळात उलटी गंगा वाहू लागली.

गोकुळ बहुराज्यला तिलांजली

या पाश्र्वभूमीवर गोकु ळची ३० ऑक्टोबरची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडावी यासाठी सभेपूर्वी दोन दिवस अगोदर अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्या स्वाक्षरीने गोकु ळ मल्टिस्टेट करणार नाही, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले होते. प्रत्यक्ष सभेत मात्र मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केल्याने मल्टिस्टेटचा ठराव कायम ठेवण्यात आला.

या मुद्दावरून विरोधी गटाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विरोधक पुन्हा आRमक झाल्याने संचालक मंडळाच्या सभेत मल्टिस्टेट रद्दचा विषय घेऊन ठराव करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी संचालक मंडळाच्या सभेत गोकुळ बहुराज्य न करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा विषय सध्यातरी संपलेला आहे.

सभेत दिलेले आश्वासन संचालक मंडळाने पूर्ण केले आहे. विधितज्ज्ञांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत प्रस्ताव केंद्रीय निबंधकांकडे पाठवण्यात येणार आहे,’ असे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले. बैठकीस ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

पुन्हा नोकरभरती

गोकुळ संघाची एप्रिलमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. नोकरभरतीचा गतवेळचा अनुभव लक्षात घेऊन तत्काळ भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी संचालकांनी केली. सध्या २३६९ इतका ‘स्टाफिंग पॅटर्न’ आहे.