सनई-चौघडय़ांची सुरावट सुरु झाली आणि वर्षांनुवष्रे प्रलंबित असलेली बँकेची थकबाकी वसूल होऊ लागल्याचा सुरेल प्रत्यय सोमवारी करवीरकरांना आला. थकबाकीदारांच्या घरासमोर सनई-चौघडय़ांची गांधीगिरी करीत दोन संस्थाचालकांकडून तब्बल सव्वाकोटी रुपये वसूल करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बडय़ा थकबाकीदारामुळे जिल्हा बँक अडचणीत आली आहे. बँकेला या आíथक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने आज (सोमवार) गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरु केले आहे. बँकेच्या बडय़ा थकबाकीदारांमध्ये मानसिंगराव गायकवाड, डॉ. संजय एस. पाटील, विजयमाला देसाई, वसंतराव पाटील – कौलवकर यांच्या दारात वसुलीसाठी आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ आणि संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी सनई चौघडय़ांच्या निनादात धडक दिली. या अनोख्या आंदोलनामुळे थकबाकीदारांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुपारी १ वाजल्यापासून जिल्हा बँकेच्या मंडळाने या मोहिमेला सुरवात केली. प्रत्येक थकबाकीदारांच्या दारात जाऊन सनई चौघडे वाजवून, फलक हातात घेऊन ठिय्या मांडला. यानंतर अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थकबाकी दारांची भेट घेऊन गुलाबपुष्प देऊन बँकेचे थकीत कर्ज भरण्याची विनंती केली. पहिल्यांदा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, इंदिरा गांधी महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई, तंबाखू समूहाचे डॉ. संजय एस. पाटील व कोल्हापूर जिल्हा बीजोत्पादक संघाचे वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या निवासस्थानी धडक दिली. गांधीगिरी पद्धतीने कर्ज वसुलीचा निर्णय घेतलेले पहिलेच संचालक मंडळ ठरले आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बंॅक २००८ साली चुकीच्या कर्जवाटपामुळे आíथक अडचणीत आली. अनेक बडय़ा कर्जदारांनी कर्जरूपाने घेतलेली रक्कम परतच केली नसल्याने बँक दिवाळखोरीत निघाली. यामुळे बँकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. प्रशासकानंतर पुन्हा संचालक मंडळ कार्यरत झाले असले तरी त्यांच्यासमोर वसुलीचे मोठे आव्हान आहे. ‘दौलत’, ‘उदयसिंगराव गायकवाड कारखाना’, ‘तंबाखू उद्योग समूह’, ‘इंदिरा कारखाना’ आदी बडय़ा थकबाकीदारांकडून वसुलीला प्रतिसादच मिळत नाही. त्यातील ‘दौलत’चा तिढा सोडविण्यास यश आले आहे. त्यानंतर उर्वरित थकबाकीदारांकडे संचालक मंडळाने आता आपला मोर्चा वळविला आहे. आजच्या गांधीगिरी आंदोलनामुळे हे थकबाकीदार बँकेचे कर्ज फेडतील, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
आजच्या आंदोलनादरम्यान मानसिंगराव गायकवाड यांनी येत्या सोमवार पर्यंत थकीत कर्जाच्या २५ टक्के रकम भरण्याचे मान्य केले आहे. वसंतराव पाटील-कौलवकर यांनी संचालक मंडळाची भेट घेत ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) साठी ५ लाख रुपयांच्या रकमेचा चेक दिला. तसेच उर्वरित रक्कम भरण्याचे देखील मान्य केले आहे. मात्र विजयमाला देसाई आणि संजय पाटील यांची भेट संचालक मंडळाला घेता आली नाही.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप झाल्यामुळे बँक आíथक अडचणीत आली आहे. त्याचा नाहक त्रास प्रशासक मंडळाला सहन करावा लागत आहे. विद्यमान संचालक मंडळाने बँकेची आíथक परिस्थिती सुधारावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच वेळप्रसंगी कडक पावले उचलण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे कारवाई केली जात आहे.